भांडवलशाही विचारसरणीचा पुरस्कार करणारी, आयन रॅंडचे तत्वज्ञान (Objectivism, व्यक्तिवादी विवेकनिष्ठ) मांडणारी ही कादंबरी आहे.
जग चालवणारे सगळे बुद्धिवादी संपावर गेले तर? ही कादंबरीची मध्यवर्ती कल्पना आहे.
आपले तत्त्वज्ञान मांडण्यासाठी तिने ही कांदबरी रचली आहे, त्याचा प्रत्यय जागोजागी येतो. यात पानांमागून पाने चर्चा आहेत, पात्रे लेखिकेची मते मांडत राहतात तरी कादंबरी आपल्याला बांधून ठेवते.
आपल्या आत एक मूल्यव्यवस्था असते आणि बाहेर समाजात एक मूल्यव्यवस्था असते, त्यात संघर्ष असला की त्याचे परिणाम काय होतात, हे ती मांडते.
समाजात, राजकारणात, उद्योगात, मानसिक पातळीवर माणसे कशी घडत जातात, सुमार बुद्धिची माणसे व्यवस्था वर आणते, ती सत्ता केंद्रित करतात आपली पोतडी भरतात.
बुद्धिवंतांना त्यांच्या मर्जीनुसार काम करायला लावतात.
गरज, त्याग,मदत, बांधिलकी, आनंद, नैतिकता, स्वातंत्र्य ..... म्हणजे काय हे ती पानांमागून पाने लिहित स्पष्ट करते.
आपण काम कशासाठी करतो? कुणासाठी करतो? आपली कर्तव्ये काय आहेत, ती कोण ठरवतं?, आपण कसे तथाकथित नीतीमूल्यांच्या हातातले बाहुले बनत जातो....
कादंबरीचा नायक जॉन गाल्ट असला तरी माझ्या मते खरी नायिका डॅग्नी आहे. कादंबरी तिच्या भोवती गुंफली आहे. गाल्ट हा लेखिकेने उभा केलेला आदर्श बुद्धिमान पुरूष आहे. डॅग्नीच्या व्यक्तीरेखेत जरातरी चढ आहे.
गाल्ट म्हणतो, ’मी कधीही दुसर्या माणसासाठी जगणार नाही आणि दुसर्या माणसाला माझ्यासाठी जगायला लावणार नाही’ हा कादंबरीचा गाभा आहे.
बुद्धिमान माणसांच्या बुद्धीवर, सर्जनशीलतेवर जगाची गाडी चालत असते, गाल्ट ही ’मोटार’ बंद पाडतो. ही माणसे आपली बुद्धी वापरायचे नाकारतात तेव्हा त्याचे जगावर होणारे परिणाम ती दाखवते. वाहतूकव्यवस्था बंद पडते, उत्पादन थांबतं, त्याहीपेक्षा माणसांचा माणसांवरील विश्वास उडतो, त्यांची जीवनेच्छा मरत जाते... जबाबदारी घ्यायला कुणी पुढेच येत नसते.
पैसा हे साधन आहे, साध्य आहे जीवनात आनंद मिळवणं,......पण "समान संधी, क्षमतेनुसार वेतन न देता गरजेनुसार देणे, स्वत:वर प्रेम न करता शेजार्यावर करायची सक्ती, ..... आणि हे सारं स्वेच्छेने चाललं असल्याचं नाटक उभं करणं" यामुळे व्यक्ती आनंदी जीवन जगू शकत नाही, असं ती मांडते.
मुग्धा कर्णिक यांनी अनुवाद चांगला केला आहे. काही ठिकाणी अस्सल मराठी शब्द ( उदा. मांडवली करणे) आले आहेत, ते दाद देण्याजोगे आहेत. वाक्यरचना मराठी वळणाची आहे. ओघवत्या भाषेत आहे.
बहुतेक भाषांमधे या कादंबरीचा अनुवाद झालेला आहे. याच्या ७० लाख प्रती विकल्या गेलेल्या आहेत.
आयन रॅंडचा जन्म रशियातला तरूण होईपर्यंत ती रशियात होती. कम्युनिस्ट राजवट तिने अनुभवली नंतर अमेरिकेतील स्वातंत्र्य अनुभवले.
हे पुस्तक वाचल्यावर पहिल्यांदा मला जाणवलं की राजकारण्यांनी आपल्या भाषेचं काय करून ठेवलं आहे!
ते ठामपणे काहीच मांडत नाहीत, बोलतात त्यातून काही अर्थ काढायचा ठरवला तर हाती काहीच लागणार नाही. लोककल्याण हा परवलीचा शब्द असतो. ते वरवर बोलतात ती भाषा वेगळी आणि त्याचे गर्भित अर्थ वेगळे, त्यात मुरलेल्यांनाच कळणारे, असे असतात.
ही दुहेरी भाषा या पुस्तकात प्रभावीपणे वापरलेली आहे.
लेखिका खोलवर जाऊन जगण्याचा शोध घेते, तिची मते पूर्णपणे पटली नाहीत तरी त्यादिशेने विचार सुरू होतो.
प्रगती म्हणजे काय? आधुनिक कशाला म्हणायचं? यावर लेखिका बोलत नाही.
बुद्धिमंत काय करतात? तर मानवी श्रम वाचवतात. वेळ वाचवतात. हा वाचलेला वेळ लोक आवडींसाठी वापरू शकतील असं ती मांडते.
हा इतका रिकामा वेळ, मग तो सुमार बुद्धिच्या लोकांना मिळालेला असू दे नाहीतर तीव्र बुद्धिच्या लोकांना मिळालेला असू दे... हा एक मानवी बॉम्ब आहे असे मला वाटते.
हे पुस्तक वाचा अशी मी शिफारस करीन. जगताना वेगवेगळ्या संकल्पना स्वत:शी स्पष्ट व्हायला हव्या असतील तर वेगवेगळी तत्वज्ञाने समजून घ्यायला हवीत.
अॅटलास श्रग्ग्ड -- आयन रॅंड
अनुवाद - मुग्धा कर्णिक
डायमंड पब्लिकेशन्स
पाने - ११७९
किंमत - ६९५ रू.
2 comments:
वा! वाचायलाच हवे.
वा. विषय अगदी जिव्हाळ्याचा आहे. कादंबरी वाचली पाहिजे.
>> कादंबरीचा नायक जॉन गाल्ट असला तरी माझ्या मते खरी नायिका डॅग्नी आहे
तू जे लिहीलं आहेस त्यातून हे अजिबातच स्पष्ट होत नाही.
>> हा इतका रिकामा वेळ, मग तो सुमार बुद्धिच्या लोकांना मिळालेला असू दे नाहीतर तीव्र बुद्धिच्या लोकांना मिळालेला असू दे... हा एक मानवी बॉम्ब आहे असे मला वाटते.
मुद्दा चांगला आहे, पण मोठा आहे आणि वादाचा आहे. इथे अप्रस्तुत वाटला. (अर्थात मी कादंबरी वाचलेली नाही.)
Post a Comment