Sunday, 27 June 2010

शुभ्र काही जीवघेणे

शोभा गुर्टु, बेगम अख्तर, सादत हसन मंटो, ओपी नय्यर, सज्जाद हुसेन, पार्श्वनाथ आळतेकर आणि पंकज मलिक या सात कलावंतांच्या आयुष्याचा आणि कलाप्रवासाचा वेध घेणार्‍या लेखांचे हे पुस्तक.
आपल्या कलागुणांनी साहित्य, नाट्य, संगीत अन सिनेमाचा परिसर उजळून काढणारी सात कलंदर व्यक्‍तिमत्वं या पुस्तकाला रेलून उभी आहेत.
प्रतिभेच्या वरदानाने आणि नितांत अस्वास्थ्याने सगळेच भारुन गेलेले, ’शुभ्र काही जीवघेणे’ शोधू पाहणारे सात मनस्वी कलावंत.

अंबरीश मिश्र हे याचे लेखक. सर्वच लेख वेगवेगळ्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेले आहेत.

कलावंतांच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेणारे लेखन मराठीत काही नवीन नाही. "गुण गाईन आवडी", "गणगोत" मधून पुलंनी आपल्यापर्यंत पोचवले काही कलंदर. पण अंबरीश मिश्रांची शैली खूप वेगळी आहे.
त्यांची लेखणी अत्यंत उत्कटतेने या सातांच्या जगण्याचा वेध घेते. त्यांच्या कलाप्रवासातील असोशी, सर्जनशीलतेतील प्रमाथीपणा विलक्षण ताकदीने आपल्यावर येउन कोसळतो, आपण अवाक होतो ते या कलावंतांच्या मनस्वी फकिरीमुळे तसेच हे आपल्यासमोर मांडणार्‍या मिश्रांच्या भरजरी तरीही तरल-कोमल भाषेमुळे.

अख्तरीबाईंवरच्या लेखाची सुरुवातच अशी ..
’दुःखाला स्वर देणार्‍या कलावंताला साल्वादॉर दालीने आपला पहिला सलाम सांगितलाय.
माझं पहिलं नमन बेगम अख्तरला आहे, तिच्या प्राणलक्षी सुरांना आहे.
अख्तरीबाईंच्या षड्जात करुणेचा लसलसता कोंभ आहे. आदिम दुःखाचं तेजाब आहे. अन हे तेजाब पचवून टाकण्याची झिंग आहे. ’खालीही सही मेरी तरफ जाम तो आया’ असा फकिरी नशा आहे. अन पुन्हा वर दशांगुळे उरणार्‍या आयुष्याशी जाबसाल करण्याची कलंदरी आहे’

काही शब्दांमध्ये खूप काही पोचवण्याची किमया या पुस्तकात ठिकठिकाणी आहे. पण ही केवळ भाषेची रोषणाई नाही तर वाचक म्हणून आपल्याला ओढून घेतलं जातं त्या प्रपातामध्ये. बेगम अख्तर हे नाव मी पहिल्यांदा वाचलं पुलंमुळे. तो लेख कितीदा वाचूनही त्यांच्या सुरांची ओळख करुन घ्यावी असं केव्हाच वाटलं नाही. अंबरीश मिश्रांची ’अख्तरीबाई’ वाचल्यावर मी तडक ’दीवाना बनाना है तो दिवाना बना दे’ च्या कॅसेटच्या शोधात बाहेर पडलो आणि मिळवलीदेखील. (सुर-स्वरांच्या आस्वादातलं बेसुरेपण मात्र संपलं नाही आणि कॅसेटपेक्षा लेखाचीच अगणित पारायणे झालीत ही कबुली येथे द्यायला हवीच.)

अशा प्रकारच्या कुठल्याही पुस्तकात असतात तसे येथे किस्से, आठवणी, दंतकथा यांचीही भरपूर पेरणी आहे.
ओपी, मंटो यांच्यासारखे विषय असल्यावर तर हे येणारच. हे सारंही खूप सहजतेने (सफाई, स्पष्टीकरणाच्या भानगडीत न पडता) आपल्यापर्यंत येतं.

’ओपी’वरचा लेख हा दोन भागात आहे. सुरुवातीच्या भागात ओपीच्या स्वत:च्या आठवणी आहेत आणि दुसर्‍या भागात ओपी-अंबरीश स्नेहाच्या आठवणी.
ओपीच्या आठवणी या ओळींपाशी संपतात.
’एक मन मला दामटतं-काही आठवू नकोस. वर्तमानात स्वस्थ बैस. दुसरं मन अल्लद भूतकाळात निघून जातं. दोन मनांचा हा झगडा अधूनमधून सुरु असतो. एक हळवं, दुखरं संवेदनशील मन, दुसरं ऐटबाज, रगेल मन. एक मन दुसर्‍या मनाला नेहमी सांगत असतं-- "मैं शायद तुम्हारे लिये अजनबी हूं.

Monday, 21 June 2010

चिन्ना

चिन्ना

चिन्ना हा भिल्या आणि मोगी या आदिवासी जोडप्याचा एकूलता एक मुलगा. तो त्याच्या आईला माय व वडिलांना बापूस म्हणतो. हा चिन्ना साधारण ४थी-५वीतला मुलगा. आदिवासी पाड्यातील आश्रमशाळेत ३री पर्यंत तो शिकलेला आहे पण पुढे शिकायची सोय नसल्याने त्याची शाळा सुटली. आणि झालं! त्याच्या मुळच्या खोडकर स्वभावाला बुद्धीची जोड मिळाली आणि झाल्या त्याच्या खोड्या सुरू! पण त्या खोड्यांमधून काहीतरी चांगलं निघतं बरं का? चिन्नाच्या त्या गमती-जमती या पुस्तकात आहेत.

या पुस्तकात एकूण सहा गोष्टी आहेत..
१. खोडकर चिन्ना.......
२. चिन्नाची फजिती.......
३. चिन्ना आणि शिकारी.........
४. कल्पक चिन्ना.........
५. चिन्नाची चतुराई.........
६. नरभक्षकाशी झुंज.........

यातील मला कल्पक चिन्ना ही गोष्ट खूप आवडते. या गोष्टीत चिन्नाची गाठ असते खुद्द " कुप्रसिध्द चंदनचोर वीरप्पन " याच्याशी! जंगलातील सात चंदनाची झाडे चोरील जाऊ नयेत म्हणून चिन्नाने केलेली खटपट खरोखरच अदभूत आहे. ही गोष्ट पुन्हा पुन्हा वाचली तरी कंटाळा येत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे काहितरी वेगळं वाचायला आपल्याला आवडतं. या पुस्तकातील भाषा, वातावरण, एकमेकाशी असलेले संबंध हे सर्वच वेगळे असल्याने वाचायला छान वाटते. पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच चिन्ना एका उंच झाडावर चढून बसलेला आहे. व मागून पक्षी उडत आहेत असे चित्र आहे. मंजुश्री गोखले यांचे हे पुस्तक जरूर वाचण्यासारखं आहे!

चिन्ना

लेखिका- सौ. मंजुश्री गोखले
प्रकाशन- जोत्स्ना प्रकाशन
चित्रकार- पुंडलीक वझे
पृष्ठ क्रमांक- ७०
किंमत- २५ रू.

Wednesday, 26 May 2010

शारदासंगीत

हातात रबराचा चेंडू घेऊन रस्त्यावरुन चालत निघालेल्या कोणत्याही पोराकडं पाहत राहायचं. तो पोरगा एखाद्या घराच्या किंवा कोणत्याही भिंतीसमोर आला की आणखीनच नीट पाहायचं त्या पोराकडं. तो पोरगा इकडं तिकडं न पाहता एक गोष्ट सरळ, सणसणीत करणार. कोणती ? हातातला चेंडू तो एकदम जोरात समोरच्या भिंतीवर फेकणार. भिंतीवर ’पॉक’ करुन आपटलेला तो चेंडू आपल्याच हातात पुन्हा झेलणार आणि मगच पुढं जाणार. खात्रीच.
-------------
घसरगुंडी वरुन घसरताना डोळे सणसणीत उघडे ठेवा. नाही तर किलकिले करा. छानच वाटणार. एकदा वाटणार, बाकीचं सगळं तसंच आहे. आपणच फक्‍त खाली खोल खोल निघालो आहोत. एकदा वाटणार, आपण आहोत तिथंच आहोत, बाकीचं सगळं जग हळू हळू वर यायलंय.
अशी ती घसरगुंडी.
जगाची पातळी की काय ती खाली-वर करायला लावणारी.
मला आवडलीच ती.

------------------------------------------------------------------
हे तर तंतोतंत माझं वर्णन असं वाचणार्‍या प्रत्येकाला वाटून सोडणारा हा बेष्टं लेखक म्हणजे प्रकाश नारायण संत.
शारदासंगीत हा त्यांचा दुसरा कथासंग्रह.
लंपन या एका संवेदनाशील मुलाच्या या गोष्टी. त्याच्याबरोबर यात त्याचे आजी-आजोबा आहेत, बाबूराव आहे, चंब्यासारखे मित्र आहेत, सुमी आहे. ग्राउंड आहे, रुळ आहेत, विहिर आहे, शाळा आहे.
वाचक जर लंपनच्या वयाच्या आसपास असेल तर लंपनच्या खांद्यावर हात टाकून या सगळ्या गोष्टींमध्ये रमून जाईल, जर तरुण, प्रौढ, वृद्‍ध असेल तर या सगळ्या गोष्टींमधून अलगद स्वतःच्या मॅड दिवसांमध्ये जाउन पोचेल, त्या आनंदाची पुन्हापुन्हा आठवण काढेल आणि हे सारं कधी हरवलं आपल्यातलं म्हणून हळवा/कातरही होईल कोणी.

या संग्रहात ५ दीर्घकथा आहेत. मला यातील शारदासंगीत ही कथा खूप आवडते. शारदासंगीत विद्यालयात नाव घातल्यापासून ते मास्तरांच्या गैरहजेरीत क्लास घेण्यापर्यंत लंपनची ही गोष्ट. त्या प्रवासात त्याला काय काय नीटच कळतं. आणि त्याच्याबरोबर आपल्यालाही.
परचक्र, आगगाडीच्या रुळांवर, रानी का बाग, घसरगुंडी या बाकीच्या चार कथा.

आपल्या लेखनाबद्दल संतांच्याच शब्दात सांगायचं तर..

मनाच्या कोपर्‍यातील एका हळव्या जगाचं दर्शन घडवणारं हे माझं लेखन.
नाद, गंध, रंग आणि स्पर्श अशा विविध माध्यमांतून त्या वयातील मुलाच्या नव्या कोर्‍या मनाला भिडणारे हे पहिलेवहिले अनुभव, आणि त्यांतून उमटणारी अतिसूक्ष्म संवेदनांची ती धावती वलयं. मनात खोल कुठेतरी झिरपून राहिलेलं हे सर्व कधीतरी अचानकच वरती उफाळून आलं आणि येतच राहिलं.



शारदासंगीत
लेखक : प्रकाश नारायण संत
मौज प्रकाशन
किंमत : १०० रु.
पाने : १६२

Thursday, 13 May 2010

झाडं लावणारा माणूस

१९१३ साली आल्प्सच्या पर्वतीय प्रदेशात लेखक फिरत असताना तो प्रदेश अतिशय उजाड असतो. झाडे नाहीत, पाणी नाही. गावे ओस पडलेली. अशा प्रदेशात खूप पायपीट केल्यावर लेखकाला एक मेंढपाळ भेटतो. लेखक त्याच्याबरोबर दोन दिवस राहतो. हा मेंढपाळ एकटा राहात असतो. रोज निवडून १०० सफेद्याच्या बिया तो माळावर जाऊन पेरत असतो.तो प्रदेश झाडांविना मरणपंथाला लागला आहे, असं त्याचं म्हणणं होतं. त्या परीस्थितीत सुधारणा करण्याची जबाबदारी त्याने घेतली होती. तोपर्यन्त त्याने एक लाख बिया पेरल्या होत्या, त्यापैकी दहा हजार झाडे वाढतील असा त्याचा अंदाज होता. लेखक म्हणाला की, त्यापुढील तीस वर्षात ही दहा हजार झाडे छान फोफावतील. त्यावर सहजपणे तो म्हणाला की त्यापुढील तीस वर्षात मी इतकी झाडे लावलेली असतील की दहा हजार झाडे म्हणजे समुद्रातला एक थेंब ठरेल. पुढे खरोखरच बीच वृक्ष लावले, ओक लावले भूर्जपत्र लावली. जंगलच्या जंगल ह्या माणसानं उभं केलं. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढली. झरे वाहू लागले, हवासुद्धा बदलली. त्यामुळे लोक त्या परीसरात राहायला येऊ लागले, गावं वसली. १९४५ साली तिथे राहणार्‍या दहा हजारांहून जास्त माणसांच्या सुखाचं कारण आहेत--एलझेआर बुफिए
एकट्या माणसाने आपलं शरीर आणि मानसीक सामर्थ्य यांच्या जोरावर वैराण वाळवंटाचं नंदनवन केलं.
हे पुस्तक मुळातूनच वाचायला हवं.
एक माणूस एकुलत्या एक आयुष्यात काय करू शकतो याचं हे अविश्वसनीय उदाहरण आहे. आपण पुस्तक वाचत जातो आणि या माणसापुढे नतमस्तक होतो. एका माणसाची कमाल ताकद काय असू शकते!!!
हा बोलका, शिकलेला, हुशार माणूस नाहीये. हा एक फार फार शहाणा माणूस आहे. (आपल्या आजूबाजूची अबोल, चटपटीत बोलू न शकणारी माणसं आतून शहाणी असू शकतात, हे आपण लक्षात ठेवू या, का?) निसर्गाची बिघडलेली व्यवस्था पूर्वपदावर आणण्याचं त्याने ठरवलं. हे त्याचं स्वप्नच किती मोठं आहे. ते त्याने प्रत्यक्षात आणलं.
त्याला एक सलाम!

'झाडं लावणारा माणूस' , लेखक-जॉं जिओनो
अनुवाद--माधुरी पुरंदरे , राजहंस प्रकाशन
किंमत--२५ रू. , पाने--३५

Monday, 10 May 2010

मोठया रानातले छोटे घर

नमस्कार! या ब्लॉगवर आवर्जून आलात त्याबद्द्ल धन्यवाद! ही पहिली दोन वाक्य लिहिण्याचे कारण म्हणजे या ब्लॉगवर कविता, हव्या त्या विषयाचे लेखन नसून फक्त पुस्तकांबद्द्लचे लेखन असेल.
त्यातला हा माझा पहिला लेख. पुस्तकाचे नाव " मोठया रानातले छोटे घर ". आता मी तुमचा वाचनाचा वेळ न दवडता सुरूवात करते,

मोठया रानातले छोटे घर हा " लॉरा इन्गाल्स वाईल्डर" यांच्या कादंबरीचा भा.रा. भागवत यांनी केलेला अनुवाद. विसकॉन्सिन च्या मोठ्या रानातील एका छोट्या लाकडी घरात रहायचे लॉरा, तिची आई कॅरोलिन, तिचे बाबा चार्लस, तिची बहीण मेरी आणि तिची कुक्कुली बहीण कॅरी. त्यांच्या आई-बाबांना त्या मा आणि पा असं म्हणायच्या. या इन्गाल्स कुटुंबाच्या गमती-जमती या पुस्तकात आहेत.
लॉरा नि मेरी जवळपास सारख्या वयाच्या पण मेरीचे केस मात्र सोनेरी आणि लॉराचे काळे! दोघी रोज आईला कामात मदत करत. मेरी मोठी असल्याने ती जास्त भांडी पुसायची, पण लॉरा मात्र स्वतःचा वाडगा, ताट्ली काळजीपूर्वक पुसायची. माचं [ आईचं ] या कामांबद्द्ल एक गाणं असे -
धुणी धुवा सोमवारी
इस्त्री करणे मंगळवारी
शिवणे टिपणे मग बुधवारी
ताक घुसळणे गुरूवारी
साफसफाई शुक्रवारी
भट्टी लावू हो शनिवारी
आराम करावा रविवारी!!!
पा [ बाबा] छान फिडल वाजवत. ते कायम मजेशीर गाणी वाजवत. ती गाणी ऐकताना लॉरा टाळ्या वाजवे. ते गोष्टीपण छान सांगत. कधी त्यांच्या वडिलांच्या तर कधी अस्वलांच्या! कधी त्यांच्या मूर्खपणाच्या तर कधी भीतीदायक अनुभवाच्या! कधी शहराच्या तर कधी साखरी बर्फाच्या, तेव्हाच्या नाचाच्या! दर रात्री सगळं काम झाल्यावर त्याच्या फिडलवादनाचा कार्यक्रम होई. आणि कधी मुलींना काही उपदेश करायचा असेल किंवा तुम्हाला असं वाटतं यात काही वेगळं नाही समजवायचं असेल तर ते आपल्या पोतडीतून गोष्टी बाहेर काढत.

अश्या या कुटुंबाचे विसकॉन्सिन च्या मोठ्या रानातील दिवस, तेव्हा घडलेल्या घटना या पुस्तकात आहेत. या पुस्तकाला विशेष कथा नाहीये. पण हे पुस्तक मनात "घर" करतं. पांचं अस्वल समजून लाकडाला मारणं, आत्याला मेरीच्या सोनेरी केसांमुळे तुला तीच आवडते नं? असं लॉराचं विचारणं यावर आपल्यालाही खदखदून हसू येतं. हे पुस्तक आपल्या आवडत्या पुस्तकांच्या यादीत हमखास नाव पटकावतं....

" मोठया रानातले छोटे घर "
लेखिका- " लॉरा इन्गाल्स वाईल्डर"
अनुवादक- भा.रा.भागवत
प्रकाशन - राजा प्रकाशन
किंमत - १०० रू.
हे पुस्तक जरूर वाचा!