Friday, 10 June 2011

अ‍ॅटलास श्रग्ग्ड

भांडवलशाही विचारसरणीचा पुरस्कार करणारी, आयन रॅंडचे तत्वज्ञान (Objectivism, व्यक्तिवादी विवेकनिष्ठ) मांडणारी ही कादंबरी आहे.
जग चालवणारे सगळे बुद्धिवादी संपावर गेले तर? ही कादंबरीची मध्यवर्ती कल्पना आहे.

आपले तत्त्वज्ञान मांडण्यासाठी तिने ही कांदबरी रचली आहे, त्याचा प्रत्यय जागोजागी येतो. यात पानांमागून पाने चर्चा आहेत, पात्रे लेखिकेची मते मांडत राहतात तरी कादंबरी आपल्याला बांधून ठेवते.

आपल्या आत एक मूल्यव्यवस्था असते आणि बाहेर समाजात एक मूल्यव्यवस्था असते, त्यात संघर्ष असला की त्याचे परिणाम काय होतात, हे ती मांडते.
समाजात, राजकारणात, उद्योगात, मानसिक पातळीवर माणसे कशी घडत जातात, सुमार बुद्धिची माणसे व्यवस्था वर आणते, ती सत्ता केंद्रित करतात आपली पोतडी भरतात.
बुद्धिवंतांना त्यांच्या मर्जीनुसार काम करायला लावतात.
गरज, त्याग,मदत, बांधिलकी, आनंद, नैतिकता, स्वातंत्र्य ..... म्हणजे काय हे ती पानांमागून पाने लिहित स्पष्ट करते.
आपण काम कशासाठी करतो? कुणासाठी करतो? आपली कर्तव्ये काय आहेत, ती कोण ठरवतं?, आपण कसे तथाकथित नीतीमूल्यांच्या हातातले बाहुले बनत जातो....
कादंबरीचा नायक जॉन गाल्ट असला तरी माझ्या मते खरी नायिका डॅग्नी आहे. कादंबरी तिच्या भोवती गुंफली आहे. गाल्ट हा लेखिकेने उभा केलेला आदर्श बुद्धिमान पुरूष आहे. डॅग्नीच्या व्यक्तीरेखेत जरातरी चढ आहे.
गाल्ट म्हणतो, ’मी कधीही दुसर्‍या माणसासाठी जगणार नाही आणि दुसर्‍या माणसाला माझ्यासाठी जगायला लावणार नाही’ हा कादंबरीचा गाभा आहे.
बुद्धिमान माणसांच्या बुद्धीवर, सर्जनशीलतेवर जगाची गाडी चालत असते, गाल्ट ही ’मोटार’ बंद पाडतो. ही माणसे आपली बुद्धी वापरायचे नाकारतात तेव्हा त्याचे जगावर होणारे परिणाम ती दाखवते. वाहतूकव्यवस्था बंद पडते, उत्पादन थांबतं, त्याहीपेक्षा माणसांचा माणसांवरील विश्वास उडतो, त्यांची जीवनेच्छा मरत जाते... जबाबदारी घ्यायला कुणी पुढेच येत नसते.
पैसा हे साधन आहे, साध्य आहे जीवनात आनंद मिळवणं,......पण "समान संधी, क्षमतेनुसार वेतन न देता गरजेनुसार देणे, स्वत:वर प्रेम न करता शेजार्‍यावर करायची सक्ती, ..... आणि हे सारं स्वेच्छेने चाललं असल्याचं नाटक उभं करणं" यामुळे व्यक्ती आनंदी जीवन जगू शकत नाही, असं ती मांडते.
मुग्धा कर्णिक यांनी अनुवाद चांगला केला आहे. काही ठिकाणी अस्सल मराठी शब्द ( उदा. मांडवली करणे) आले आहेत, ते दाद देण्याजोगे आहेत. वाक्यरचना मराठी वळणाची आहे. ओघवत्या भाषेत आहे.

बहुतेक भाषांमधे या कादंबरीचा अनुवाद झालेला आहे. याच्या ७० लाख प्रती विकल्या गेलेल्या आहेत.
आयन रॅंडचा जन्म रशियातला तरूण होईपर्यंत ती रशियात होती. कम्युनिस्ट राजवट तिने अनुभवली नंतर अमेरिकेतील स्वातंत्र्य अनुभवले.

हे पुस्तक वाचल्यावर पहिल्यांदा मला जाणवलं की राजकारण्यांनी आपल्या भाषेचं काय करून ठेवलं आहे!
ते ठामपणे काहीच मांडत नाहीत, बोलतात त्यातून काही अर्थ काढायचा ठरवला तर हाती काहीच लागणार नाही. लोककल्याण हा परवलीचा शब्द असतो. ते वरवर बोलतात ती भाषा वेगळी आणि त्याचे गर्भित अर्थ वेगळे, त्यात मुरलेल्यांनाच कळणारे, असे असतात.
ही दुहेरी भाषा या पुस्तकात प्रभावीपणे वापरलेली आहे.

लेखिका खोलवर जाऊन जगण्याचा शोध घेते, तिची मते पूर्णपणे पटली नाहीत तरी त्यादिशेने विचार सुरू होतो.
प्रगती म्हणजे काय? आधुनिक कशाला म्हणायचं? यावर लेखिका बोलत नाही.

बुद्धिमंत काय करतात? तर मानवी श्रम वाचवतात. वेळ वाचवतात. हा वाचलेला वेळ लोक आवडींसाठी वापरू शकतील असं ती मांडते.
हा इतका रिकामा वेळ, मग तो सुमार बुद्धिच्या लोकांना मिळालेला असू दे नाहीतर तीव्र बुद्धिच्या लोकांना मिळालेला असू दे... हा एक मानवी बॉम्ब आहे असे मला वाटते.

हे पुस्तक वाचा अशी मी शिफारस करीन. जगताना वेगवेगळ्या संकल्पना स्वत:शी स्पष्ट व्हायला हव्या असतील तर वेगवेगळी तत्वज्ञाने समजून घ्यायला हवीत.

अ‍ॅटलास श्रग्ग्ड -- आयन रॅंड
अनुवाद - मुग्धा कर्णिक
डायमंड पब्लिकेशन्स
पाने - ११७९
किंमत - ६९५ रू.

Monday, 25 April 2011

पत्र

आचवल गेल्यावर त्यांचं काही अप्रकाशित आणि कांही दिवाळी अंकांमधे प्रकाशित झालेलं लेखन ’ पत्र ’ या पुस्तकांत एकत्र केलेलं आहे. त्यांत काही कथा, काही ललितलेख आहेत.
माधव आचवलांचं लेखन मला आवडतं. त्यांचं ’किमया’ हे माझ्या आवडत्या पुस्तकांपैकी एक आहे. साध्या दृष्याकडे, घटनेकडे त्यांच्या नजरेने आपण पाहू लागलो की वेगळे अर्थ लागतात. त्यांच्या पद्धतीने त्यातले बारकावे ते टिपत जातात आणि समोरचं दृष्य बदलत जातं. ते केवळ भावनिक आंदोलनं टिपत नाहीत, ज्यातून आपण मनाचा अंदाज लावत असतो, ती देहबोली प्रभावीपणे पुढे आणतात. लिहिलेलं थोडंच असतं पण त्यानिमित्ताने ते जे सांगू पाहात असतात ते टिपायला मजा येते.
’ पत्र’ हा त्यांचा अप्रतिम लेख आहे. पत्र पाठवणं, नंतरचं उत्तराची वाट पाहणं, ते पाकीट हातात आल्यावर उघडेपर्यंतची मनाची अवस्था या लेखात आली आहे. पाकिटामगच्या त्रिकोणाच्या टोकाशी केलेली दोन उभ्या रेघांची खूण ते दोघांचं विश्व आहे हे दर्शविणारी, आचवलांनी त्यावरही किती छान लिहिलं आहे!
त्यानंतरचा अंक हा लेखही सुंदर आहे. शारीरप्रेमाचं इतकं सुंदर वर्णन क्वचित कुठे आलं असेल.
प्रभाते करदर्शनम या लेखात त्यांनी म्हंटलंय... मी माझ्याच तळहाताकडे पुन: बघितलं आणि मन एकदम चमकलं. वाटलं हा एक प्राणीच आहे. अनेक तर्‍हेच्या हालचाली करू शकणारा, उलटणारा, वळणारा, बोटांचे पाय असलेला आणि या प्रत्येक पायाचा आकार निराळा, लांबी निराळी, जाडेपणा निराळा, सांधे निराळे, ताकत निराळी. मीच बोटांची हालचाल करून बघितली. एकदम सर्व बोटं, तळवा, हातच हलवून पाहिला. एकदम किती या हालचाली! इतक्या करता याव्या म्हणून का इतक्या रेषा, इतके सांधे? नव्हे हा प्राणी नव्हे. हे एक समुद्र-पुष्प ! पाकळ्यांची हालचाल करणारं, मनगटातून उगवलेलं फूल हे... शरीराच्या हातडहाळीच्या अग्रावर उमललेलं चाफ्याचं फूल हे! ....असलं काही सुचायला आचवलंच हवे! त्यांच्यातला रसिक, कलाकार आणि वास्तुशिल्पज्ञ असा मधून मधून डोकावत असतो.
एका लेखात ते व्यंकटेशस्तोत्रातले काव्यगुण उलगडून दाखवतात.
’आम्ही दोडके ’ हा एक विनोदी लेख आहे. ’क्षण’ आणि ’निनी’ या दोन कथा आहेत. निराळ्या काढल्या तर कदाचित आचवलांच्या म्हणून ओळखू येणार नाहीत.
’यं इदं मम शरीरं’ आणि ’लागली ब्रह्मानंदी टाळी’ हे दोन अफलातून लेख आहेत. शरीराचा त्यांनी इतका बारकाईने विचार केलेला आहे, शैलीसुद्धा अस्सल आचवली आहे, ते मुळातून वाचायला हवेत.
’अखेर’ हा एक खास जमलेला लेख आहे. घरामागचे, त्यांच्या लिहिण्याच्या खोलीतून दिसणारे, छान, मोठे , जुने, जिथून खारी सहज घरांत येऊ शकतात असे, प्राण्यापक्षांना आपलेसे करणारे, लिंबाचे झाड आहे. एक दिवस ते कोसळते...... माणसे दोन तासांत सगळे साफ करतात...... जिथे झाड होते, तिथे आता फक्त ओली तुटकी जखम होती.
आपण वाचताना सुन्न होऊन जातो.

’पत्र’ वाचायलाच हवे, असं मी सुचवीन. आचवलांनी मोजकंच पण ते वाचल्याशिवाय आपण पुढे जावूच शकणार नाही, असं मराठीत लिहिलं आहे.
मराठीत जे थोडकं लेखन वाचकांना ते प्रौढ आहेत असं धरून केलेले आहे त्यातले हे लेखन आहे.

पत्र
माधव आचवल
मौज प्रकाशन गृह
पहिली आवृत्ती जाने ९२
पाने ८६
http://www.bookganga.com/eBooks/Books?AID=4816269569736270352