Thursday, 13 May 2010

झाडं लावणारा माणूस

१९१३ साली आल्प्सच्या पर्वतीय प्रदेशात लेखक फिरत असताना तो प्रदेश अतिशय उजाड असतो. झाडे नाहीत, पाणी नाही. गावे ओस पडलेली. अशा प्रदेशात खूप पायपीट केल्यावर लेखकाला एक मेंढपाळ भेटतो. लेखक त्याच्याबरोबर दोन दिवस राहतो. हा मेंढपाळ एकटा राहात असतो. रोज निवडून १०० सफेद्याच्या बिया तो माळावर जाऊन पेरत असतो.तो प्रदेश झाडांविना मरणपंथाला लागला आहे, असं त्याचं म्हणणं होतं. त्या परीस्थितीत सुधारणा करण्याची जबाबदारी त्याने घेतली होती. तोपर्यन्त त्याने एक लाख बिया पेरल्या होत्या, त्यापैकी दहा हजार झाडे वाढतील असा त्याचा अंदाज होता. लेखक म्हणाला की, त्यापुढील तीस वर्षात ही दहा हजार झाडे छान फोफावतील. त्यावर सहजपणे तो म्हणाला की त्यापुढील तीस वर्षात मी इतकी झाडे लावलेली असतील की दहा हजार झाडे म्हणजे समुद्रातला एक थेंब ठरेल. पुढे खरोखरच बीच वृक्ष लावले, ओक लावले भूर्जपत्र लावली. जंगलच्या जंगल ह्या माणसानं उभं केलं. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढली. झरे वाहू लागले, हवासुद्धा बदलली. त्यामुळे लोक त्या परीसरात राहायला येऊ लागले, गावं वसली. १९४५ साली तिथे राहणार्‍या दहा हजारांहून जास्त माणसांच्या सुखाचं कारण आहेत--एलझेआर बुफिए
एकट्या माणसाने आपलं शरीर आणि मानसीक सामर्थ्य यांच्या जोरावर वैराण वाळवंटाचं नंदनवन केलं.
हे पुस्तक मुळातूनच वाचायला हवं.
एक माणूस एकुलत्या एक आयुष्यात काय करू शकतो याचं हे अविश्वसनीय उदाहरण आहे. आपण पुस्तक वाचत जातो आणि या माणसापुढे नतमस्तक होतो. एका माणसाची कमाल ताकद काय असू शकते!!!
हा बोलका, शिकलेला, हुशार माणूस नाहीये. हा एक फार फार शहाणा माणूस आहे. (आपल्या आजूबाजूची अबोल, चटपटीत बोलू न शकणारी माणसं आतून शहाणी असू शकतात, हे आपण लक्षात ठेवू या, का?) निसर्गाची बिघडलेली व्यवस्था पूर्वपदावर आणण्याचं त्याने ठरवलं. हे त्याचं स्वप्नच किती मोठं आहे. ते त्याने प्रत्यक्षात आणलं.
त्याला एक सलाम!

'झाडं लावणारा माणूस' , लेखक-जॉं जिओनो
अनुवाद--माधुरी पुरंदरे , राजहंस प्रकाशन
किंमत--२५ रू. , पाने--३५

3 comments:

मुक्‍ता said...

मस्त! मला खूप आवडलं!
- मुक्ता

मिलिन्द बाम said...

या पुस्तकापासून प्रेरणा घेउन संगमनेर परिसरात दंडकारण्य अभियान उभं राहिलं त्याची गोष्ट

http://www.loksatta.in/index.php?option=com_content&view=article&id=9193:2009-09-18-12-22-43&catid=34:2009-07-09-02-04-26&Itemid=11

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=2256392

मोहिनी लिमये- मोडक said...

समीक्षण मस्तच पण ...
(आपल्या आजूबाजूची अबोल, चटपटीत बोलू न शकणारी माणसं आतून शहाणी असू शकतात, हे आपण लक्षात ठेवू या, का?)..........
या वाक्यासाठी तुलाच सलाम !!!