Friday, 9 August 2013

झिम्मा

"झिम्मा" हे विजया मेहता यांचं नाट्यविषयक आठवणीचं संकलन आहे किंवा व्यावसायिक चरित्र आहे असं म्हणता येईल.
विजया मेहतांचं आत्मचरित्र म्हणजे त्यातून खूप काही गवसेल अशी अपेक्षा ठेवून पुस्तक वाचायला घेतलं. पुस्तक तसं चांगलं आहे, एकदा वाचलंच पाहिजे असंही, पण अपेक्षा पुर्‍या होत नाहीत.
 एक संथ निवेदन, थोड्या चढ उतारांसकट सुरू आहे...... आपण उत्कर्षबिंदूच्या प्रतिक्षेत, तो येतच नाही.
काळाचा एक मोठा पट आपल्यासमोर उलगडत जातो. पाच वर्षांची बेबी.... विजया.... विजया जयवंत... बाई... विजया खोटे... विजया मेहता.
कुटूंबातली धाकटी बेबी, तिचं आणि बायजीचं नातं, मग विजया तिचं आजूबाजूच्या जगाकडे पाहणं, विजया जयवंत म्हणून नाटकांत प्रवेश, जाणीवपूर्वक चित्रपटांची वाट नाकारणं,साहित्य संघ..., अलेक पदमसी, अदी मर्झबान या गुरूंकडून शिकणं, रंगायनची सुरूवात ...... हरीन खोटेंशी लग्न, त्या आधीपासूनच दुर्गाबाई खोट्यांशी जवळीक, शिष्यत्व, मधेच जमशेदपूर, तिथे काही जमवाजमव, मुंबईत परत, रंगायन जोमाने, एकीकडे रंगायनची नाटकं, दुसरीकडे पुलंच्या नाटकात कामे असं सुरू. मग फरोख मेहतांशी लग्न, इंग्लंडमधे तीन वर्षे वास्तव्य, तिथल्या रंगभूमीची ओळख करून घेणं, कार्यशाळा ...., तिथल्या रंगभूमीवरची नाटकं पाहणं,  रंगायनवर अखेरचा पडदा, व्यावसायिक नाटकांमधे भूमिका आणि दिग्दर्शन, जर्मन रंगभूमीवर काही नाटके, एन. एस. डी. चं अध्यक्षपद, एन.सी.पी.ए. ची संचालक म्हणून काम .......... असं भरगच्च आयुष्य आहे.
 सुरूवातीलाच त्यांनी म्हंटलंय नाट्यकलेमधून उभे राहणारे काही असामान्य क्षण, ’द मॅजिक ऑफ थियेटर’  चा शोध घ्यावा हा लिखाणाचा हेतु आहे.
 तसे काही क्षण उभे करायचा त्यांनी प्रयत्न केला आहे, पीटर ब्रूक च्या महाभारताचं वर्णन किंवा इडिपसचं वर्णन... नागमंडल ची सुरूवात..... ते त्रोटक झालं आहे अजून हवं होतं. बॉडी इमेज सापडण्याचे क्षण चांगले रंगवले आहेत. शितू किंवा नानी किंवा मावशीबाई..... लोकमान्य (त्यांचाच शब्द) रंगभूमीवर त्यांनी दिग्दर्शित आणि अभिनीत केलेल्या नाटकांविषयी सविस्तर लिहिलेलं आहे. रेनेसांचा काळ मस्त उभा केला आहे.
 त्या मानानं रंगायनच्या नाटकांविषयी फारसं लिहिलेलं नाही.
जर्मनीत नेलेल्या नाटकांविषयीही विस्ताराने आलं आहे तरीही सर्वकाही सांगितलंय असं झालेलं नाही.
बाईंचा आवाका खूप मोठा आहे त्यामानाने वाचकाच्या पदरात पडत नाही.
बाईंनी त्यांची नाटकं वगळता इतर समकालीन नाटकांविषयी, दिग्दर्शकांविषयी, त्यांच्या शैली विषयी काहीही लिहिलेलं नाही. तेंडूलकर, एलकुंचवार असोत की दळवी असोत, त्यांच्या इतर कामांविषयी काहीच नाही. भवताल उभा करून त्यात विजयाबाईंची नाटकं, असं झालेलं नाही. वाचकांना केवळ बाईंचा नाट्यप्रवास एवढाच दिसतो. अजब न्याय वर्तुळाचा असेल किंवा मुद्राराक्षस, शांकुतल, हयवदन असेल जर्मनीत नाटक नेणं , करणं यामागचे कष्ट दिसतात पण त्यांचं स्थान, महत्त्व? ते पुरेसं स्पष्ट होत नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर कितीसे असे प्रोजेक्ट होत असणार? बाईंचं मोठेपण पुरेसं पोचत नाही.
 विजयाबाईंची नाट्यकलेवरची मतंही ठोसपणे येत नाहीत. भावविवशता आणि भावनोद्रेक यांवर एक चांगलं टिपण आहे. बॉडी इमेज शोधण्यावर आहे, स्तालिनावस्कीचे उल्लेख येतात, पीटर ब्रूक काय म्हणतो येतं, भूमिकेची लय, ताल यावर आहे, नटांच्या एकपात्री अभिनयाबद्दल आहे, पण तरीही विजयाबाईंकडून अजून हवं होतं.
 बाईंचे धारदार आग्रह पुढे येत नाहीत, झालेले वाद नाहीत.
वैयक्तीक आयुष्यातलंही बाई मोकळेपणानं सांगत नाहीत. हरीन का आवडला? फरोखमधे काय गवसलं? काहीच नाही, बायजी, दुर्गाबाई आणि बापाईजीबद्दल त्या कृतज्ञता व्यक्त करतात, त्यांच्यामुळेच मला जमलं वगैरे पण बापाईजीबरोबरचा एकही प्रसंग नाही.
 बहुतेकदा विजयाबाई स्वत:च मत व्यक्त करतात, वाचकाला ते बनवू देत नाहीत. पीटर ब्रूक बाईंना गुरूसमान आहेत, तर का बुवा?
नाटकांतील पात्रांच्या मनात उतरणार्‍या बाई स्वत:च्या मनात उतरत नाहीत. तिथले कल्लॊळ वाचकाला कळत नाहीत. या विजयाबाईंनी वाचकांशी स्टेजवर मारलेल्या गप्पा आहेत. विश्वासात घेऊन माजघरात मारलेल्य़ा गप्पा नाहीत.
 याची बाईंनांही बहुदा कल्पना आहे. त्या म्हणतात, " लिखाणासाठी मनाच्या खोल भुयारात शिरावं लागतं. एकांतांत स्वत:भोवती घिरट्या घालणं गरजेचं होऊन बसतं. अन मला तर माझ्या सहवासाचा मनस्वी कंटाळा येतो. माझ्याजवळ फक्त मीच असले की मी पार बुजते. मला सतत कुणीतरी सोबतीला लागतं...." यामुळे वाचकाला हातचं राखून सांगितलंय हे कळत जातं.

  डोक्यावर वह्या , फायली ठेवून, फुटपाथच्या कडेवरून अन टाचा उंचावून, दोन्ही हात पंखासारखे पसरून , चालणारी विजू...... हरवून जाते, सापडतच नाही, वाचकाला याची हुरहुर वाटत राहते.

 तरीही मी शिफारस करीन की हे पुस्तक वाचाच. यातून जे मिळतं तेही खूप आहे. एकदा वाचायलाच हवं.

झिम्मा - आठवणींचा गॊफ
लेखिका -- विजया मेहता,
राजहंस प्रकाशन
पाने - ४४० , किंमत - ३७५ रूपये.

Saturday, 19 January 2013

व्हिन्सेंट व्हान गॉग






व्हिन्सेंट व्हान गॉग याच्या जीवनावर आधारीत ’लस्ट फॉर लाईफ’ या इंग्रजी कादंबरीचा हे पुस्तक म्हणजे स्वैर अनुवाद आहे.
माधुरी पुरंदरेंनी केलेल अनुवाद चांगला आहे. काहीवेळा इंग्रजी वाक्यरचनेचा प्रभाव जाणवतो. पण व्हान गॉगचं आयुष्यचं असं आहे की आपणही झपाटल्यासारखे वाचत जातो.
 कादंबरी सुरू होते ती त्याच्या पहिल्या प्रेमापासून.
वय वर्षे २२..... ते वय वर्षे ३९.... हा प्रवास यात आहे.

आपण नुसती कादंबरी वाचून दमून जातो. हा माणूस कसा जगला असेल , देव जाणे.
हा झपाटलेला होता. दर क्षणी जे जे जाणवत होतं, करावंसं वाटत होतं, त्याच्याशी प्रामाणिक होता.
उर्सुलाला केवळ पाहण्यासाठी तो रात्र रात्र चालत होता.
बोरीनाजमधल्या कामगारांसाठी तो त्यांच्यातला एक होऊन राहिला. त्यांच्यासारखा जगला.

पॅरीसमधे असताना इंप्रेशनिस्ट चित्रकारांसाठी एक कॉलनी काढायची ठरवली, सगळी योजना पूर्ण झाल्यावर त्याचं आतलं मन म्हणालं, यात तुला चित्र काढायला वेळ मिळत ्नाहीये, तुला चित्र काढायची आहेत. ते जाणवलं त्या क्षणी त्याने ती योजना सोडून दिली.
 आणि सूर्याच्या ध्यासानं आर्ल मधे गेला. वेड्यासारखी उन्हातान्हात, तहान भूक विसरून, चित्रं केली. पेटत्या सूर्याचा पिवळा रंग! त्याची चित्रे उजळून गेली.

 दिवस अन दिवस झपाटल्यासारखं काम, उपास आणि पेटतं ऊन... त्याला अपस्माराचा आजार जडला. कानात कसले कसले आवाज ऎकू यायला लागले. त्या झटक्यात एके दिवशी कान कापून त्याने प्रेयसीला नेऊन दिला.
 त्याला मानसीक रुग्णांच्या हॉस्पीटल मधे राहायला लागलं. जरा बरं वाटल्यावर त्याने पुन्हा चित्रं सुरू केली.


........................... ओव्हेरला असताना त्या झटक्यामधे त्याने स्वत:वर गोळी चालवली. वय फक्त ३९ वर्षं.

या सगळ्या काळात त्याच्यावर आपुलकीचं छत्र धरून होता तो त्याचा धाकटा भाऊ तेओ! त्याने व्हिन्सेंटला जपलं, त्याला पैसा पुरवला, सोबत केली, त्याच्यावर आभाळभर माया केली. व्हिन्सेंट व्हान गॉगनं आपल्या भावाला सातत्याने अनेक पत्रे लिहिली. पुस्तकातला बराच भाग पत्रांवर आधारीत आहे.

 व्हान गॉग हा असला कलंदर माणूस होता. जे केलं ते त्याने जीव ओतून केलं. सुरूवातीला आयुष्याच्या अनेक आघाड्यांवर त्याला अपयश आलं. काही करत असो, तो जगण्याचा अर्थ शोधत होता. चित्र काढताना त्या माणसांचं मन दाखवण्याचा प्रयत्न करत होता, त्याचं आजवरचं आयुष्य, त्याची सुखं, त्याची दु:खं, सारंचं त्याला चित्रातून व्यक्त करायचं असे. त्याने शेकडो अभ्यासचित्रं केली. चित्रकलेचं औपचारिक शिक्षण न घेतलेला हा माणूस वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी यात पडला. झपाटल्यासारखं काम करून ठेवलं आहे. त्याला चित्रात सूर्य हवा म्हणून तो पेटत्या उन्हाच्या आर्लमधे गेला आणि उन्ह भोगायचं आणि मग चित्रात उतरवायचं म्हणून डोक्यावर टोपीदेखील घेतली नाही.उन्हाने त्याचे केस जळून गेले.
 त्याच्या हयातीत त्याची बोटावर मोजण्याइतकीच चित्रं विकल्या गेली असतील. त्याच्या वाट्याला दारिद्र्य, उपास, उपेक्षा, हेटाळणीच आली. ते सगळं पचवून हा माणूस चित्रं काढत होता.

  सध्या काहीही वाचत असले, ऎकत असले की मनात येतं या व्यक्तीचा ’बाई’ कडॆ पाहण्याचा दृष्टीकोन कसा आहे? याच्या जगण्यात बाईचं स्थान काय आहे?

  उर्सुला काय आणि के काय दोघींनीही त्याचं प्रेम झिडकारलं. ख्रिस्तीनचा त्याने स्वीकार केला आणि तिच्याशी लग्न करायचं ठरवलं, हे मला खूप महत्त्वाचं वाटलं. त्याने तिला लग्नाच्या बायकोचा दर्जा देऊ केला. आणि तिचं मूल , स्वत:चं म्हणून स्वीकारलं.तिला मॉडेल म्हणून बसता यावं यासाठी तो सकाळी लवकर उठून घरकामही करत असे. मार्गेट बरोबरही त्याचं लग्न होऊ शकलं नाही. रॅचेल आर्लेझियन दिवसात त्याला सोबत होती.
  त्याला मॉडेल देखील शेतकरी, विणकर बायका/ माणसं आवडत. खरी ओबडधोबड माणसं काढायला त्याला आवडत.



 पण तो काय आणि त्याचे इंप्रेशनिस्ट मित्र काय, त्यांच्या आयुष्यात महत्त्वाचं काय होतं तर चित्र आणि चित्रंच. बायकांच्या शरीरामुळे किंवा प्रेमामुळे कॅनव्हासवरचे रंग अधिक अस्सल होणार असतील तर तेव्हढ्यासाठीच त्यांना बायका हव्या होत्या. (अर्थात हे दीडशे वर्षांपूर्वीचे दिवस आहेत./होते.)

 अध्यात्मात बायका म्हणजे मुक्तीच्या मार्गातली धोंड म्हणून त्यांना दूर ठेवा, आधुनिकतेत बायकांमुळे व्यक्त होण्यात विविध भावछटा येणार आहेत म्हणून त्यांना जवळ करा. दोन्हीकडे त्या केवळ साधनच आहेत की काय?

  पुस्तक वाचायलाच हवं. कलाकाराची कलेविषयीची ओढ काय असते याचा एक अंदाज येऊ शकेल.

व्हिन्सेंट व्हान गॉग,
 लेखक -- आयर्व्हिंग स्टोन
अनुवाद -- माधुरी पुरंदरे
पुरंदरे प्रकाशन

आवृत्ती दुसरी -- मूल्य २०० रू.
पाने - ३२६