आचवल गेल्यावर त्यांचं काही अप्रकाशित आणि कांही दिवाळी अंकांमधे प्रकाशित झालेलं लेखन ’ पत्र ’ या पुस्तकांत एकत्र केलेलं आहे. त्यांत काही कथा, काही ललितलेख आहेत.
माधव आचवलांचं लेखन मला आवडतं. त्यांचं ’किमया’ हे माझ्या आवडत्या पुस्तकांपैकी एक आहे. साध्या दृष्याकडे, घटनेकडे त्यांच्या नजरेने आपण पाहू लागलो की वेगळे अर्थ लागतात. त्यांच्या पद्धतीने त्यातले बारकावे ते टिपत जातात आणि समोरचं दृष्य बदलत जातं. ते केवळ भावनिक आंदोलनं टिपत नाहीत, ज्यातून आपण मनाचा अंदाज लावत असतो, ती देहबोली प्रभावीपणे पुढे आणतात. लिहिलेलं थोडंच असतं पण त्यानिमित्ताने ते जे सांगू पाहात असतात ते टिपायला मजा येते.
’ पत्र’ हा त्यांचा अप्रतिम लेख आहे. पत्र पाठवणं, नंतरचं उत्तराची वाट पाहणं, ते पाकीट हातात आल्यावर उघडेपर्यंतची मनाची अवस्था या लेखात आली आहे. पाकिटामगच्या त्रिकोणाच्या टोकाशी केलेली दोन उभ्या रेघांची खूण ते दोघांचं विश्व आहे हे दर्शविणारी, आचवलांनी त्यावरही किती छान लिहिलं आहे!
त्यानंतरचा अंक हा लेखही सुंदर आहे. शारीरप्रेमाचं इतकं सुंदर वर्णन क्वचित कुठे आलं असेल.
प्रभाते करदर्शनम या लेखात त्यांनी म्हंटलंय... मी माझ्याच तळहाताकडे पुन: बघितलं आणि मन एकदम चमकलं. वाटलं हा एक प्राणीच आहे. अनेक तर्हेच्या हालचाली करू शकणारा, उलटणारा, वळणारा, बोटांचे पाय असलेला आणि या प्रत्येक पायाचा आकार निराळा, लांबी निराळी, जाडेपणा निराळा, सांधे निराळे, ताकत निराळी. मीच बोटांची हालचाल करून बघितली. एकदम सर्व बोटं, तळवा, हातच हलवून पाहिला. एकदम किती या हालचाली! इतक्या करता याव्या म्हणून का इतक्या रेषा, इतके सांधे? नव्हे हा प्राणी नव्हे. हे एक समुद्र-पुष्प ! पाकळ्यांची हालचाल करणारं, मनगटातून उगवलेलं फूल हे... शरीराच्या हातडहाळीच्या अग्रावर उमललेलं चाफ्याचं फूल हे! ....असलं काही सुचायला आचवलंच हवे! त्यांच्यातला रसिक, कलाकार आणि वास्तुशिल्पज्ञ असा मधून मधून डोकावत असतो.
एका लेखात ते व्यंकटेशस्तोत्रातले काव्यगुण उलगडून दाखवतात.
’आम्ही दोडके ’ हा एक विनोदी लेख आहे. ’क्षण’ आणि ’निनी’ या दोन कथा आहेत. निराळ्या काढल्या तर कदाचित आचवलांच्या म्हणून ओळखू येणार नाहीत.
’यं इदं मम शरीरं’ आणि ’लागली ब्रह्मानंदी टाळी’ हे दोन अफलातून लेख आहेत. शरीराचा त्यांनी इतका बारकाईने विचार केलेला आहे, शैलीसुद्धा अस्सल आचवली आहे, ते मुळातून वाचायला हवेत.
’अखेर’ हा एक खास जमलेला लेख आहे. घरामागचे, त्यांच्या लिहिण्याच्या खोलीतून दिसणारे, छान, मोठे , जुने, जिथून खारी सहज घरांत येऊ शकतात असे, प्राण्यापक्षांना आपलेसे करणारे, लिंबाचे झाड आहे. एक दिवस ते कोसळते...... माणसे दोन तासांत सगळे साफ करतात...... जिथे झाड होते, तिथे आता फक्त ओली तुटकी जखम होती.
आपण वाचताना सुन्न होऊन जातो.
’पत्र’ वाचायलाच हवे, असं मी सुचवीन. आचवलांनी मोजकंच पण ते वाचल्याशिवाय आपण पुढे जावूच शकणार नाही, असं मराठीत लिहिलं आहे.
मराठीत जे थोडकं लेखन वाचकांना ते प्रौढ आहेत असं धरून केलेले आहे त्यातले हे लेखन आहे.
पत्र
माधव आचवल
मौज प्रकाशन गृह
पहिली आवृत्ती जाने ९२
पाने ८६
http://www.bookganga.com/eBooks/Books?AID=4816269569736270352