Friday, 13 August 2010

रारंगढांग

रारंगढांग ही माणसाच्या आणि निसर्गाच्या, माणसा माणसातल्या, मैत्रीची आणि संघर्षाची गोष्ट आहे.
एका बाजूला हिमालय दुसर्‍या बाजूला तिथे काम करणारी माणसे. कधी ती हिमालयासमोर क्षुद्र वाटतात/ असतातच, तर कधी ती एवढीशी माणसे त्यांच्या जिद्दीमुळे, इच्छाशक्तीमुळे अफाट वाटत राहतात. या लढाईत या माणसांकडे काय आहे? विज्ञान, तंत्रज्ञान आहेच पण त्या जोडीला आहेत त्यांचे प्राण.
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन हिमालयात रस्ते बांधण्याचं काम करते. विरळ ऑक्सीजन, कमालीची थंडी, रस्त्यावर साठणारे सत्तरऎंशी फूट बर्फ, लॅन्डस्लाईडस, याचा मनावर होणारा परीणाम.... शिवाय़ या वातावरणात यंत्रेही नेहमीच्या क्षमतेने काम करू शकत नाहीत. या उंचीवर जगातल्या कुठल्या देशाने क्वचितच रस्ते बांधले असतील.
ह्या रस्ता बांधण्याच्या कामावर एक विश्वनाथ हा सिव्हीलियन ऑफिसर नेमला जातो. तो मुंबईतली चांगल्या कंपनीतली, चांगल्या पगाराची नोकरी सोडून आवडीचं काम करायला आला आहे.
त्याला रारंगढांगातून रस्ता काढण्याची जागा चुकीची वाटत असते. ढांग म्हणजे उभा नितळ कडा. बाजूने वाहणारी सतलज, त्याच्या कडेने कोरत रस्ता बांधणे हा यातला सगळ्यात अवघड भाग. एकूणच त्याच्या कामामुळे, ज्ञानामुळे, निष्ठांमुळे त्याचे वरीष्ठांशी खटके उडत असतात. साहस आणि धैर्य यांची फक्त सैन्यात गरज असते असं नाही तर सामान्य नागरीकही कितीतरी धैर्याने जगत असतात. तुम्ही धैर्याची, साहसाची व्याख्या कशी करता यावर ते अवलंबून आहे.
विश्वनाथ हा काही मुल्ये मानणारा, आचरणात आणणारा, मुळातून विचार करणारा माणूस आहे.वरवर व्यवस्थेची घडी बसविण्यासाठी काही नियम केलेले असतात पण मुळातून त्यात विचित्र विसंगती असते, हे सगळे नियम परंपरेने पाळले जातात, हे सारे कुणासाठी आणि का? याची उत्तरे कोणी शोधत नाही. सैन्यात तर आपली पायरी आणि वरीष्ठांचे आदेश हे एक मोठेच प्रकरण असते. या माणसाच्या डोळ्यांनी आपण ही गोष्ट बघत जातो, बघत जातोच म्हणायला पाहिजे इतकी कादंबरीची शैली चित्रदर्शी आहे. त्यामुळे सैन्याच्या कामातल्या मर्यादा सहजपणे नजरेत भरत जातात.
विश्वनाथ कामावर रूजू होतो, आपल्या पद्धतीने काम करू पाहतो, अगदी तसं शक्य होत नाही, त्याला आपल्या कामासाठी माणसांचे प्राण घ्यायचे नसतात, तो भीती व्यक्त करत असतो तिथेच रारंगढांगात अपघात होते, सात जणांचा जीव जातो, आपल्या अखत्यारीत विश्वनाथ ढांगात योग्य ते काम करून घेतो. त्यामुळे त्याच्यावर कोर्ट्मार्शल....आणि त्याचा निकाल.
विश्वनाथ हा सगळ्यांना आवडावा असाच नायक आहे. त्याच्याकडे काय नाही? आपल्याला हवंहवंसं वाटतं ते सगळंच. विचार करणं, निरपेक्षपणे योग्य-अयोग्य ठरवू शकणं. त्याचं आपल्या हाताखालच्या माणसाशी वागणं, वरीष्ठांशी वागणं, भवतालाचा विचार करणं, विकास म्हणजे काय? याबाबत संभ्रमात असणं, माणसाच्या प्राणांची किंमत असणं, वडीलांशी एका घट्ट धाग्याने बांधलेलं असणं, आपण प्रेम करतोय हे माहीत नसणं. या सगळ्यात मला आवडलं ते ’ज्यात काही केल्याचा आनंद लाभेल असे काम” करण्याची असोशी.
ही कादंबरी वाचायलाच हवी अशी मी शिफारस करीन. आखीव-रेखीव, व्यक्तीरेखांची घट्ट बांधणी, मोजके पण ठसणारे पसंग, प्रभावी संवाद, सतत सांभाळलेला ओघ, चित्रमय शैली ही या पुस्तकाची वैशिष्ठे आहेत. यातली पत्रं पण फार हृद्य आहेत. विश्वनाथच्या व्यक्तीमत्वाला, कोकणातले बाबा आणि मुंबईतली उमा यांची एक उत्कट, हळवी किनार आहे.

शेवटी ”जब आदमी मर जाता है तो उसका क्या रहता है? एक यादगारी!"

रारंगढांग
प्रभाकर पेंढारकर
मौज प्रकाशन गृह
पाने - १७५