Friday 9 August 2013

झिम्मा

"झिम्मा" हे विजया मेहता यांचं नाट्यविषयक आठवणीचं संकलन आहे किंवा व्यावसायिक चरित्र आहे असं म्हणता येईल.
विजया मेहतांचं आत्मचरित्र म्हणजे त्यातून खूप काही गवसेल अशी अपेक्षा ठेवून पुस्तक वाचायला घेतलं. पुस्तक तसं चांगलं आहे, एकदा वाचलंच पाहिजे असंही, पण अपेक्षा पुर्‍या होत नाहीत.
 एक संथ निवेदन, थोड्या चढ उतारांसकट सुरू आहे...... आपण उत्कर्षबिंदूच्या प्रतिक्षेत, तो येतच नाही.
काळाचा एक मोठा पट आपल्यासमोर उलगडत जातो. पाच वर्षांची बेबी.... विजया.... विजया जयवंत... बाई... विजया खोटे... विजया मेहता.
कुटूंबातली धाकटी बेबी, तिचं आणि बायजीचं नातं, मग विजया तिचं आजूबाजूच्या जगाकडे पाहणं, विजया जयवंत म्हणून नाटकांत प्रवेश, जाणीवपूर्वक चित्रपटांची वाट नाकारणं,साहित्य संघ..., अलेक पदमसी, अदी मर्झबान या गुरूंकडून शिकणं, रंगायनची सुरूवात ...... हरीन खोटेंशी लग्न, त्या आधीपासूनच दुर्गाबाई खोट्यांशी जवळीक, शिष्यत्व, मधेच जमशेदपूर, तिथे काही जमवाजमव, मुंबईत परत, रंगायन जोमाने, एकीकडे रंगायनची नाटकं, दुसरीकडे पुलंच्या नाटकात कामे असं सुरू. मग फरोख मेहतांशी लग्न, इंग्लंडमधे तीन वर्षे वास्तव्य, तिथल्या रंगभूमीची ओळख करून घेणं, कार्यशाळा ...., तिथल्या रंगभूमीवरची नाटकं पाहणं,  रंगायनवर अखेरचा पडदा, व्यावसायिक नाटकांमधे भूमिका आणि दिग्दर्शन, जर्मन रंगभूमीवर काही नाटके, एन. एस. डी. चं अध्यक्षपद, एन.सी.पी.ए. ची संचालक म्हणून काम .......... असं भरगच्च आयुष्य आहे.
 सुरूवातीलाच त्यांनी म्हंटलंय नाट्यकलेमधून उभे राहणारे काही असामान्य क्षण, ’द मॅजिक ऑफ थियेटर’  चा शोध घ्यावा हा लिखाणाचा हेतु आहे.
 तसे काही क्षण उभे करायचा त्यांनी प्रयत्न केला आहे, पीटर ब्रूक च्या महाभारताचं वर्णन किंवा इडिपसचं वर्णन... नागमंडल ची सुरूवात..... ते त्रोटक झालं आहे अजून हवं होतं. बॉडी इमेज सापडण्याचे क्षण चांगले रंगवले आहेत. शितू किंवा नानी किंवा मावशीबाई..... लोकमान्य (त्यांचाच शब्द) रंगभूमीवर त्यांनी दिग्दर्शित आणि अभिनीत केलेल्या नाटकांविषयी सविस्तर लिहिलेलं आहे. रेनेसांचा काळ मस्त उभा केला आहे.
 त्या मानानं रंगायनच्या नाटकांविषयी फारसं लिहिलेलं नाही.
जर्मनीत नेलेल्या नाटकांविषयीही विस्ताराने आलं आहे तरीही सर्वकाही सांगितलंय असं झालेलं नाही.
बाईंचा आवाका खूप मोठा आहे त्यामानाने वाचकाच्या पदरात पडत नाही.
बाईंनी त्यांची नाटकं वगळता इतर समकालीन नाटकांविषयी, दिग्दर्शकांविषयी, त्यांच्या शैली विषयी काहीही लिहिलेलं नाही. तेंडूलकर, एलकुंचवार असोत की दळवी असोत, त्यांच्या इतर कामांविषयी काहीच नाही. भवताल उभा करून त्यात विजयाबाईंची नाटकं, असं झालेलं नाही. वाचकांना केवळ बाईंचा नाट्यप्रवास एवढाच दिसतो. अजब न्याय वर्तुळाचा असेल किंवा मुद्राराक्षस, शांकुतल, हयवदन असेल जर्मनीत नाटक नेणं , करणं यामागचे कष्ट दिसतात पण त्यांचं स्थान, महत्त्व? ते पुरेसं स्पष्ट होत नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर कितीसे असे प्रोजेक्ट होत असणार? बाईंचं मोठेपण पुरेसं पोचत नाही.
 विजयाबाईंची नाट्यकलेवरची मतंही ठोसपणे येत नाहीत. भावविवशता आणि भावनोद्रेक यांवर एक चांगलं टिपण आहे. बॉडी इमेज शोधण्यावर आहे, स्तालिनावस्कीचे उल्लेख येतात, पीटर ब्रूक काय म्हणतो येतं, भूमिकेची लय, ताल यावर आहे, नटांच्या एकपात्री अभिनयाबद्दल आहे, पण तरीही विजयाबाईंकडून अजून हवं होतं.
 बाईंचे धारदार आग्रह पुढे येत नाहीत, झालेले वाद नाहीत.
वैयक्तीक आयुष्यातलंही बाई मोकळेपणानं सांगत नाहीत. हरीन का आवडला? फरोखमधे काय गवसलं? काहीच नाही, बायजी, दुर्गाबाई आणि बापाईजीबद्दल त्या कृतज्ञता व्यक्त करतात, त्यांच्यामुळेच मला जमलं वगैरे पण बापाईजीबरोबरचा एकही प्रसंग नाही.
 बहुतेकदा विजयाबाई स्वत:च मत व्यक्त करतात, वाचकाला ते बनवू देत नाहीत. पीटर ब्रूक बाईंना गुरूसमान आहेत, तर का बुवा?
नाटकांतील पात्रांच्या मनात उतरणार्‍या बाई स्वत:च्या मनात उतरत नाहीत. तिथले कल्लॊळ वाचकाला कळत नाहीत. या विजयाबाईंनी वाचकांशी स्टेजवर मारलेल्या गप्पा आहेत. विश्वासात घेऊन माजघरात मारलेल्य़ा गप्पा नाहीत.
 याची बाईंनांही बहुदा कल्पना आहे. त्या म्हणतात, " लिखाणासाठी मनाच्या खोल भुयारात शिरावं लागतं. एकांतांत स्वत:भोवती घिरट्या घालणं गरजेचं होऊन बसतं. अन मला तर माझ्या सहवासाचा मनस्वी कंटाळा येतो. माझ्याजवळ फक्त मीच असले की मी पार बुजते. मला सतत कुणीतरी सोबतीला लागतं...." यामुळे वाचकाला हातचं राखून सांगितलंय हे कळत जातं.

  डोक्यावर वह्या , फायली ठेवून, फुटपाथच्या कडेवरून अन टाचा उंचावून, दोन्ही हात पंखासारखे पसरून , चालणारी विजू...... हरवून जाते, सापडतच नाही, वाचकाला याची हुरहुर वाटत राहते.

 तरीही मी शिफारस करीन की हे पुस्तक वाचाच. यातून जे मिळतं तेही खूप आहे. एकदा वाचायलाच हवं.

झिम्मा - आठवणींचा गॊफ
लेखिका -- विजया मेहता,
राजहंस प्रकाशन
पाने - ४४० , किंमत - ३७५ रूपये.

Saturday 19 January 2013

व्हिन्सेंट व्हान गॉग






व्हिन्सेंट व्हान गॉग याच्या जीवनावर आधारीत ’लस्ट फॉर लाईफ’ या इंग्रजी कादंबरीचा हे पुस्तक म्हणजे स्वैर अनुवाद आहे.
माधुरी पुरंदरेंनी केलेल अनुवाद चांगला आहे. काहीवेळा इंग्रजी वाक्यरचनेचा प्रभाव जाणवतो. पण व्हान गॉगचं आयुष्यचं असं आहे की आपणही झपाटल्यासारखे वाचत जातो.
 कादंबरी सुरू होते ती त्याच्या पहिल्या प्रेमापासून.
वय वर्षे २२..... ते वय वर्षे ३९.... हा प्रवास यात आहे.

आपण नुसती कादंबरी वाचून दमून जातो. हा माणूस कसा जगला असेल , देव जाणे.
हा झपाटलेला होता. दर क्षणी जे जे जाणवत होतं, करावंसं वाटत होतं, त्याच्याशी प्रामाणिक होता.
उर्सुलाला केवळ पाहण्यासाठी तो रात्र रात्र चालत होता.
बोरीनाजमधल्या कामगारांसाठी तो त्यांच्यातला एक होऊन राहिला. त्यांच्यासारखा जगला.

पॅरीसमधे असताना इंप्रेशनिस्ट चित्रकारांसाठी एक कॉलनी काढायची ठरवली, सगळी योजना पूर्ण झाल्यावर त्याचं आतलं मन म्हणालं, यात तुला चित्र काढायला वेळ मिळत ्नाहीये, तुला चित्र काढायची आहेत. ते जाणवलं त्या क्षणी त्याने ती योजना सोडून दिली.
 आणि सूर्याच्या ध्यासानं आर्ल मधे गेला. वेड्यासारखी उन्हातान्हात, तहान भूक विसरून, चित्रं केली. पेटत्या सूर्याचा पिवळा रंग! त्याची चित्रे उजळून गेली.

 दिवस अन दिवस झपाटल्यासारखं काम, उपास आणि पेटतं ऊन... त्याला अपस्माराचा आजार जडला. कानात कसले कसले आवाज ऎकू यायला लागले. त्या झटक्यात एके दिवशी कान कापून त्याने प्रेयसीला नेऊन दिला.
 त्याला मानसीक रुग्णांच्या हॉस्पीटल मधे राहायला लागलं. जरा बरं वाटल्यावर त्याने पुन्हा चित्रं सुरू केली.


........................... ओव्हेरला असताना त्या झटक्यामधे त्याने स्वत:वर गोळी चालवली. वय फक्त ३९ वर्षं.

या सगळ्या काळात त्याच्यावर आपुलकीचं छत्र धरून होता तो त्याचा धाकटा भाऊ तेओ! त्याने व्हिन्सेंटला जपलं, त्याला पैसा पुरवला, सोबत केली, त्याच्यावर आभाळभर माया केली. व्हिन्सेंट व्हान गॉगनं आपल्या भावाला सातत्याने अनेक पत्रे लिहिली. पुस्तकातला बराच भाग पत्रांवर आधारीत आहे.

 व्हान गॉग हा असला कलंदर माणूस होता. जे केलं ते त्याने जीव ओतून केलं. सुरूवातीला आयुष्याच्या अनेक आघाड्यांवर त्याला अपयश आलं. काही करत असो, तो जगण्याचा अर्थ शोधत होता. चित्र काढताना त्या माणसांचं मन दाखवण्याचा प्रयत्न करत होता, त्याचं आजवरचं आयुष्य, त्याची सुखं, त्याची दु:खं, सारंचं त्याला चित्रातून व्यक्त करायचं असे. त्याने शेकडो अभ्यासचित्रं केली. चित्रकलेचं औपचारिक शिक्षण न घेतलेला हा माणूस वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी यात पडला. झपाटल्यासारखं काम करून ठेवलं आहे. त्याला चित्रात सूर्य हवा म्हणून तो पेटत्या उन्हाच्या आर्लमधे गेला आणि उन्ह भोगायचं आणि मग चित्रात उतरवायचं म्हणून डोक्यावर टोपीदेखील घेतली नाही.उन्हाने त्याचे केस जळून गेले.
 त्याच्या हयातीत त्याची बोटावर मोजण्याइतकीच चित्रं विकल्या गेली असतील. त्याच्या वाट्याला दारिद्र्य, उपास, उपेक्षा, हेटाळणीच आली. ते सगळं पचवून हा माणूस चित्रं काढत होता.

  सध्या काहीही वाचत असले, ऎकत असले की मनात येतं या व्यक्तीचा ’बाई’ कडॆ पाहण्याचा दृष्टीकोन कसा आहे? याच्या जगण्यात बाईचं स्थान काय आहे?

  उर्सुला काय आणि के काय दोघींनीही त्याचं प्रेम झिडकारलं. ख्रिस्तीनचा त्याने स्वीकार केला आणि तिच्याशी लग्न करायचं ठरवलं, हे मला खूप महत्त्वाचं वाटलं. त्याने तिला लग्नाच्या बायकोचा दर्जा देऊ केला. आणि तिचं मूल , स्वत:चं म्हणून स्वीकारलं.तिला मॉडेल म्हणून बसता यावं यासाठी तो सकाळी लवकर उठून घरकामही करत असे. मार्गेट बरोबरही त्याचं लग्न होऊ शकलं नाही. रॅचेल आर्लेझियन दिवसात त्याला सोबत होती.
  त्याला मॉडेल देखील शेतकरी, विणकर बायका/ माणसं आवडत. खरी ओबडधोबड माणसं काढायला त्याला आवडत.



 पण तो काय आणि त्याचे इंप्रेशनिस्ट मित्र काय, त्यांच्या आयुष्यात महत्त्वाचं काय होतं तर चित्र आणि चित्रंच. बायकांच्या शरीरामुळे किंवा प्रेमामुळे कॅनव्हासवरचे रंग अधिक अस्सल होणार असतील तर तेव्हढ्यासाठीच त्यांना बायका हव्या होत्या. (अर्थात हे दीडशे वर्षांपूर्वीचे दिवस आहेत./होते.)

 अध्यात्मात बायका म्हणजे मुक्तीच्या मार्गातली धोंड म्हणून त्यांना दूर ठेवा, आधुनिकतेत बायकांमुळे व्यक्त होण्यात विविध भावछटा येणार आहेत म्हणून त्यांना जवळ करा. दोन्हीकडे त्या केवळ साधनच आहेत की काय?

  पुस्तक वाचायलाच हवं. कलाकाराची कलेविषयीची ओढ काय असते याचा एक अंदाज येऊ शकेल.

व्हिन्सेंट व्हान गॉग,
 लेखक -- आयर्व्हिंग स्टोन
अनुवाद -- माधुरी पुरंदरे
पुरंदरे प्रकाशन

आवृत्ती दुसरी -- मूल्य २०० रू.
पाने - ३२६

Saturday 4 February 2012

मॉरीबरोबरचे मंगळवार.

सोशिऑलॉजी प्राध्यापक असलेल्या मॉरी श्वार्झ यांना उत्तरायुष्यात ALS या दुर्धर आजाराने घेरलं. एकेक करुन अवयव दगा देणार, आपण परावलंबी होत जाणार आणि एक दिवस (लवकरच) मृत्यु समोर सयंत्र उभा ठाकणार हा या आजाराचा अटळ शेवट त्यांना कळला होताच.

या शेवटच्या प्रवासाचा अभ्यास करायचं त्यांनी ठरवलं, एक विद्यार्थी हाताशी घेतला आणि काम चालू झालं

(त्यांचाच १५~२० वर्षापूर्वीचा विद्यार्थी, मधल्या काळात संपर्क तुटलेला).

वर्ग भरायचा दर मंगळवारी, विषय होता, ’जगण्याचा अर्थ’, शिकवताना अनुभव हा संदर्भ होता.

श्रेणी दिल्या जात नव्हत्या, प्रण प्रत्येक वर्गात तोंडी परीक्षा असायची, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागायची आणि स्वत: प्रश्नही विचारावे लागायचे. प्राध्यापकांना शारीरिक हालचालीत मदत केली तर बरं, त्यांचा पाय उचलून ठेवायचा, त्यांचा घसरलेला चष्मा पुन्हा नीट नाकावर ठेवायचा वगैरे.

पुस्तकांची गरज नव्हतीच, तरीही खूप मुद्दे चर्चिले जायचे. प्रेम, काम, कुटुंब, समाज, वार्धक्य, क्षमा आणि शेवटी, मरण.

शेवटचा वर्ग अगदीच थोड्या वेळेत संपला, काही शब्दच फक्त बोलले गेले.

अंत्यविधी हाच पदवीप्रदान समारंभ होता.

काय शिकलात त्यावर एक प्रबंध लिहिणं मात्र अपेक्षित होतं.

तो प्रबंध म्हणजे
tuesdays with Morrie हे मिच आल्बम या लेखकाचे पुस्तक.

तो विद्यार्थी म्हणजे मिच.

an old man, a young man and life's greatest lesson ही या पुस्तकाची मुखपृष्ठावरची ओळख आहे.

८ वर्षांपूर्वी हे पुस्तक पहिल्यांदा मी वाचलं आणि अस्वस्थ झालो, त्यानंतर कितीतरी वेळा मी हे वाचून काढलं. कल्पनेतही अविश्वसनीय वाटावा असा मॉरी हा माणूस आहे. मरणाची पावलं स्पष्टपणे ऐकू येताहेत हे कळल्यावर मॉरीने ठरवलं की जीवनापासून मृत्युकडे होत असणारी आपली वाटचाल आपण स्वत: अभ्यासायची, इतरांना अभ्यासू द्यायची. कुणी गेल्यावर लोक इतकं छान छान बोलतात पण गेलेल्याला ते काहीच ऐकता येत नाही हे काही बरं नाही असं मॉरीला वाटलं आणि त्याने जिवंतपणीच स्वत:साठी श्रद्‍धांजलीचा कार्यक्रम घडवून आणला.

मधल्या काळात जगण्याच्या कुतरओढीत ऐहिक यशाची नवीनवी ध्येयं गाठण्यात मिच पूर्ण गुरफटून गेलेला होता. अकस्मात एक दिवस टीव्हीवर त्याला मॉरीच्या या अभ्यासप्रकल्पाची बातमी कळते आणि तो आपल्या जुन्या कोचला भेटायला येतो.

इथून पुढे त्यांचे वर्ग चालू होतात, आपल्याला दोघांच्या भूतकाळातल्या काही घटना कळतात, मिचला त्याचा कोच भेटतो, मिचला जुना हरवलेला मिच पुन्हा भेटतो.

हे सगळं अगदी अवश्य मुळातून वाचायला हवं. (सुनंदा अमरापूरकरांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे)

मॉरीच्या शब्दात,

या आजाराबरोबर हळूहळू संपत जात असताना, मला आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा धडा शिकायला मिळाला आहे.

The most important thing in life is to learn how to give out love, and how to let it come in.

Love is the only rational act.

Here is how we are different from those wonderful plants and animals..

As long as we can love each other, and remember the feeling of love we had, we can die without ever really going away. All the love you created is still there. All the memories are still there. You live on-in the hearts of everyone you have touched and nurtured while you were here.


Death ends a life, not a relationship.


 

 



 

 

 

टीप

याच ढळत्या दिवसात, अमेरिकन टीव्हीवर मॉरीच्या मुलाखती प्रदर्शित झाल्या, त्या या दुव्यावर पाहायला मिळतील.

http://video.google.com/videoplay?docid=3863455317235235085#

Thursday 19 January 2012

रण - दुर्ग

रण - दुर्ग

मिलिन्द बोकीलांच्या दोन दीर्घकथा आहेत. कादंबरी असा उल्लेख का केला असावा, कळले नाही.
दोन्ही कथांच्या नायिका एमएसडब्ल्यू करून एनजीओत काम करणार्‍या आहेत.
दोन्ही दीर्घकथा एका पातळीपर्यंत पोचतात, विचार करायला प्रवृत्त करतात, त्यापलीकडे ज्या उंचीवर जातील याची अपेक्षा असते, तिथवर पोचत नाहीत.
रण कथेत नमिताने नागेशला घटस्फोट दिलेला आहे, मुलाला घेऊन एकटी राहते. घटस्फोटानंतर भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेले असताना, कच्छच्या रणात दोघे भेटतात.
त्याला वाटतं, घटस्फोटाचं कारण ’तो पूर्वी दारू प्यायचा, सिगरेटी ओढायचा, हे आहे." विचारपूर्वक ते तो बंद करतो. त्याची नमिताबरोबर पुन्हा एकत्र राहण्याची इच्छा आहे. नमिता म्हणते तेच एक महत्त्वाचे कारण नाही, तो तसा छानच आहे, सभ्य , मनमिळाऊ, हसतमुख, पोलिटिकली अगदी करेक्ट, कुणालाही वाटेल काय मस्त माणूस आहे! ... आतून अगदी पोकळ . त्याच्याबरोबर एकत्र राहतो त्या प्रत्येक क्षणीच कळतं ते!"
या बिंदूपासून कथा उतरत जाते. नमिताला काय म्हणायचं आहे ते नीट स्पष्ट होत नाही, ती ते शोधायलाच जात नाही. तिला हा माणूस असा आहे हे कळतं, ती आतल्या आवाजाला ओ देते, गुंते सोडवत नाही. म्हणजे एका गुहेच्या दाराशी पोचते आणि मागे फिरते.
दुर्ग या कथेतही नायिकेला काय हवं आहे? कळत नाही. काही समाज परीस्थितीच्या आणि कौंटुंबिक अडचणी तर असणारच, तरी तशी प्रतिकूलता नसताना त्या निष्क्रिय आहेत.
दोघींनाही मनातलं बोलू शकू अशा मैत्रिणी आहेत, ही मैत्री कशी होत जाते ते नाही.
दोघीही नव्या पिढीतल्या आहेत. सेक्स ही त्यांच्यासाठी सहज गोष्ट आहे, म्हणजे साधी नाही पण सोबत नैतिकतेचे, जबाबदारीचे प्रश्नही घेऊन येत नाही. ही सहजता धक्का देऊ शकते. वाहून जाण्याच्या प्रत्येक क्षणी त्या जाग्या आहेत.
रण आणि दुर्ग या दोन्ही कथांमधे
कच्छचे रण आणि दुर्ग ही दोन महत्त्वाची पात्रे आहेत. catalyst सारखी! ती नसती तर दोघींनी जे निर्णय घेतले ते कदाचित घेतले नसते. आजवर आपण कथांमधून परीस्थिती कशी घडवते हे बघत आलो पण हे वेगळं आहे. खरं आहे.
बाकी वाचलंच पाहिजे असं काही नाही.
आपल्याला नुसता कथा आणि कादंबर्‍यामधे रस नसेल आणि लेखक कसा वाढतो, कसकसा विचार करतो यातही रस असेल तर हे पुस्तक वाचा.


रण - दुर्ग -- लेखक मिलिंद बोकील
मौज प्रकाशन गृह
पाने - १७२, किंमत - १६० रू.

Friday 10 June 2011

अ‍ॅटलास श्रग्ग्ड

भांडवलशाही विचारसरणीचा पुरस्कार करणारी, आयन रॅंडचे तत्वज्ञान (Objectivism, व्यक्तिवादी विवेकनिष्ठ) मांडणारी ही कादंबरी आहे.
जग चालवणारे सगळे बुद्धिवादी संपावर गेले तर? ही कादंबरीची मध्यवर्ती कल्पना आहे.

आपले तत्त्वज्ञान मांडण्यासाठी तिने ही कांदबरी रचली आहे, त्याचा प्रत्यय जागोजागी येतो. यात पानांमागून पाने चर्चा आहेत, पात्रे लेखिकेची मते मांडत राहतात तरी कादंबरी आपल्याला बांधून ठेवते.

आपल्या आत एक मूल्यव्यवस्था असते आणि बाहेर समाजात एक मूल्यव्यवस्था असते, त्यात संघर्ष असला की त्याचे परिणाम काय होतात, हे ती मांडते.
समाजात, राजकारणात, उद्योगात, मानसिक पातळीवर माणसे कशी घडत जातात, सुमार बुद्धिची माणसे व्यवस्था वर आणते, ती सत्ता केंद्रित करतात आपली पोतडी भरतात.
बुद्धिवंतांना त्यांच्या मर्जीनुसार काम करायला लावतात.
गरज, त्याग,मदत, बांधिलकी, आनंद, नैतिकता, स्वातंत्र्य ..... म्हणजे काय हे ती पानांमागून पाने लिहित स्पष्ट करते.
आपण काम कशासाठी करतो? कुणासाठी करतो? आपली कर्तव्ये काय आहेत, ती कोण ठरवतं?, आपण कसे तथाकथित नीतीमूल्यांच्या हातातले बाहुले बनत जातो....
कादंबरीचा नायक जॉन गाल्ट असला तरी माझ्या मते खरी नायिका डॅग्नी आहे. कादंबरी तिच्या भोवती गुंफली आहे. गाल्ट हा लेखिकेने उभा केलेला आदर्श बुद्धिमान पुरूष आहे. डॅग्नीच्या व्यक्तीरेखेत जरातरी चढ आहे.
गाल्ट म्हणतो, ’मी कधीही दुसर्‍या माणसासाठी जगणार नाही आणि दुसर्‍या माणसाला माझ्यासाठी जगायला लावणार नाही’ हा कादंबरीचा गाभा आहे.
बुद्धिमान माणसांच्या बुद्धीवर, सर्जनशीलतेवर जगाची गाडी चालत असते, गाल्ट ही ’मोटार’ बंद पाडतो. ही माणसे आपली बुद्धी वापरायचे नाकारतात तेव्हा त्याचे जगावर होणारे परिणाम ती दाखवते. वाहतूकव्यवस्था बंद पडते, उत्पादन थांबतं, त्याहीपेक्षा माणसांचा माणसांवरील विश्वास उडतो, त्यांची जीवनेच्छा मरत जाते... जबाबदारी घ्यायला कुणी पुढेच येत नसते.
पैसा हे साधन आहे, साध्य आहे जीवनात आनंद मिळवणं,......पण "समान संधी, क्षमतेनुसार वेतन न देता गरजेनुसार देणे, स्वत:वर प्रेम न करता शेजार्‍यावर करायची सक्ती, ..... आणि हे सारं स्वेच्छेने चाललं असल्याचं नाटक उभं करणं" यामुळे व्यक्ती आनंदी जीवन जगू शकत नाही, असं ती मांडते.
मुग्धा कर्णिक यांनी अनुवाद चांगला केला आहे. काही ठिकाणी अस्सल मराठी शब्द ( उदा. मांडवली करणे) आले आहेत, ते दाद देण्याजोगे आहेत. वाक्यरचना मराठी वळणाची आहे. ओघवत्या भाषेत आहे.

बहुतेक भाषांमधे या कादंबरीचा अनुवाद झालेला आहे. याच्या ७० लाख प्रती विकल्या गेलेल्या आहेत.
आयन रॅंडचा जन्म रशियातला तरूण होईपर्यंत ती रशियात होती. कम्युनिस्ट राजवट तिने अनुभवली नंतर अमेरिकेतील स्वातंत्र्य अनुभवले.

हे पुस्तक वाचल्यावर पहिल्यांदा मला जाणवलं की राजकारण्यांनी आपल्या भाषेचं काय करून ठेवलं आहे!
ते ठामपणे काहीच मांडत नाहीत, बोलतात त्यातून काही अर्थ काढायचा ठरवला तर हाती काहीच लागणार नाही. लोककल्याण हा परवलीचा शब्द असतो. ते वरवर बोलतात ती भाषा वेगळी आणि त्याचे गर्भित अर्थ वेगळे, त्यात मुरलेल्यांनाच कळणारे, असे असतात.
ही दुहेरी भाषा या पुस्तकात प्रभावीपणे वापरलेली आहे.

लेखिका खोलवर जाऊन जगण्याचा शोध घेते, तिची मते पूर्णपणे पटली नाहीत तरी त्यादिशेने विचार सुरू होतो.
प्रगती म्हणजे काय? आधुनिक कशाला म्हणायचं? यावर लेखिका बोलत नाही.

बुद्धिमंत काय करतात? तर मानवी श्रम वाचवतात. वेळ वाचवतात. हा वाचलेला वेळ लोक आवडींसाठी वापरू शकतील असं ती मांडते.
हा इतका रिकामा वेळ, मग तो सुमार बुद्धिच्या लोकांना मिळालेला असू दे नाहीतर तीव्र बुद्धिच्या लोकांना मिळालेला असू दे... हा एक मानवी बॉम्ब आहे असे मला वाटते.

हे पुस्तक वाचा अशी मी शिफारस करीन. जगताना वेगवेगळ्या संकल्पना स्वत:शी स्पष्ट व्हायला हव्या असतील तर वेगवेगळी तत्वज्ञाने समजून घ्यायला हवीत.

अ‍ॅटलास श्रग्ग्ड -- आयन रॅंड
अनुवाद - मुग्धा कर्णिक
डायमंड पब्लिकेशन्स
पाने - ११७९
किंमत - ६९५ रू.

Monday 25 April 2011

पत्र

आचवल गेल्यावर त्यांचं काही अप्रकाशित आणि कांही दिवाळी अंकांमधे प्रकाशित झालेलं लेखन ’ पत्र ’ या पुस्तकांत एकत्र केलेलं आहे. त्यांत काही कथा, काही ललितलेख आहेत.
माधव आचवलांचं लेखन मला आवडतं. त्यांचं ’किमया’ हे माझ्या आवडत्या पुस्तकांपैकी एक आहे. साध्या दृष्याकडे, घटनेकडे त्यांच्या नजरेने आपण पाहू लागलो की वेगळे अर्थ लागतात. त्यांच्या पद्धतीने त्यातले बारकावे ते टिपत जातात आणि समोरचं दृष्य बदलत जातं. ते केवळ भावनिक आंदोलनं टिपत नाहीत, ज्यातून आपण मनाचा अंदाज लावत असतो, ती देहबोली प्रभावीपणे पुढे आणतात. लिहिलेलं थोडंच असतं पण त्यानिमित्ताने ते जे सांगू पाहात असतात ते टिपायला मजा येते.
’ पत्र’ हा त्यांचा अप्रतिम लेख आहे. पत्र पाठवणं, नंतरचं उत्तराची वाट पाहणं, ते पाकीट हातात आल्यावर उघडेपर्यंतची मनाची अवस्था या लेखात आली आहे. पाकिटामगच्या त्रिकोणाच्या टोकाशी केलेली दोन उभ्या रेघांची खूण ते दोघांचं विश्व आहे हे दर्शविणारी, आचवलांनी त्यावरही किती छान लिहिलं आहे!
त्यानंतरचा अंक हा लेखही सुंदर आहे. शारीरप्रेमाचं इतकं सुंदर वर्णन क्वचित कुठे आलं असेल.
प्रभाते करदर्शनम या लेखात त्यांनी म्हंटलंय... मी माझ्याच तळहाताकडे पुन: बघितलं आणि मन एकदम चमकलं. वाटलं हा एक प्राणीच आहे. अनेक तर्‍हेच्या हालचाली करू शकणारा, उलटणारा, वळणारा, बोटांचे पाय असलेला आणि या प्रत्येक पायाचा आकार निराळा, लांबी निराळी, जाडेपणा निराळा, सांधे निराळे, ताकत निराळी. मीच बोटांची हालचाल करून बघितली. एकदम सर्व बोटं, तळवा, हातच हलवून पाहिला. एकदम किती या हालचाली! इतक्या करता याव्या म्हणून का इतक्या रेषा, इतके सांधे? नव्हे हा प्राणी नव्हे. हे एक समुद्र-पुष्प ! पाकळ्यांची हालचाल करणारं, मनगटातून उगवलेलं फूल हे... शरीराच्या हातडहाळीच्या अग्रावर उमललेलं चाफ्याचं फूल हे! ....असलं काही सुचायला आचवलंच हवे! त्यांच्यातला रसिक, कलाकार आणि वास्तुशिल्पज्ञ असा मधून मधून डोकावत असतो.
एका लेखात ते व्यंकटेशस्तोत्रातले काव्यगुण उलगडून दाखवतात.
’आम्ही दोडके ’ हा एक विनोदी लेख आहे. ’क्षण’ आणि ’निनी’ या दोन कथा आहेत. निराळ्या काढल्या तर कदाचित आचवलांच्या म्हणून ओळखू येणार नाहीत.
’यं इदं मम शरीरं’ आणि ’लागली ब्रह्मानंदी टाळी’ हे दोन अफलातून लेख आहेत. शरीराचा त्यांनी इतका बारकाईने विचार केलेला आहे, शैलीसुद्धा अस्सल आचवली आहे, ते मुळातून वाचायला हवेत.
’अखेर’ हा एक खास जमलेला लेख आहे. घरामागचे, त्यांच्या लिहिण्याच्या खोलीतून दिसणारे, छान, मोठे , जुने, जिथून खारी सहज घरांत येऊ शकतात असे, प्राण्यापक्षांना आपलेसे करणारे, लिंबाचे झाड आहे. एक दिवस ते कोसळते...... माणसे दोन तासांत सगळे साफ करतात...... जिथे झाड होते, तिथे आता फक्त ओली तुटकी जखम होती.
आपण वाचताना सुन्न होऊन जातो.

’पत्र’ वाचायलाच हवे, असं मी सुचवीन. आचवलांनी मोजकंच पण ते वाचल्याशिवाय आपण पुढे जावूच शकणार नाही, असं मराठीत लिहिलं आहे.
मराठीत जे थोडकं लेखन वाचकांना ते प्रौढ आहेत असं धरून केलेले आहे त्यातले हे लेखन आहे.

पत्र
माधव आचवल
मौज प्रकाशन गृह
पहिली आवृत्ती जाने ९२
पाने ८६
http://www.bookganga.com/eBooks/Books?AID=4816269569736270352

Sunday 26 September 2010

तोत्तोचान






तोत्तोचान ही गोष्ट आहे एका लहान मुलीची. काही निरागसतेने केलेल्या खोड्यांमुळे तिची शाळेतून हाकलपट्टी होते. मग तोमोई तिला आधार देते. तिथली धम्माल ,रेल्वेचे डबे , डोंगरावरचं, समुद्रावरच खाणं या सार्‍याशी तोत्तोचान केव्हाच एकरूप होते. तिचे आवडते शिक्षक असतात मुख्याध्यापक सोसाकु कोबायशी हे असतात. " तुम्हाला माहितीये तुम्ही सर्व एक आहात. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही रहा. कुठलही काम करा पण तुम्ही सर्व एक आहात". असं ते नेहमी सांगत. तोत्तोचानच्या व तोमोईच्या या छोट्या छोट्या गोष्टी मिळूनच हे पुस्तक तयार झालं आहे.
या पुस्तकात वेळोवेळी दिलेली चित्रही खूप सुंदर आहेत. एकूणच हे एक परिपूर्ण पुस्तक आहे, लहान मोठे सर्वांनी वाचावं असं! मला यातल्या काही गोष्टी फार आवडतात. उदा.
" वेण्या", "सगळं पुन्हा आत टाक", "तोत्तोचानचं नाव", "पोह्ण्याचा तलाव" इ. या सर्वच गोष्टी खूपच अप्रतिम आहेत असं नाही पण त्या आपल्याशा वाटतात. म्हणूनच तोत्तोचान सगळ्यांना आवडते.
कारण आपण तसं कधीतरी वागलेलो असतो/ आपल्याला तसं वागायचं असतं. तोत्तोचान का आवडलं याला खरं तर स्पष्ट असं उत्तरच नाहिये. मी ते वाचलं आणि मला ते मनापासून आवडलंय. तोत्तोचान मधला अजून एक शब्द मला खूप आवडतो, तो म्हणजे " नै " आपण साधारणः "नाही का", असा शब्द वापरतो पण हा शब्दच जास्त निरागस वाटतो नै?
तोत्तोचान मला वाचायला खूप आवडलयं आणि तुम्हालाही आवडेल याची मला खात्री आहे!

तोत्तोचान
मूळ लेखिका- तेत्सुको कुरोयानागी
अनुवादिका- चेतना सरदेशमुख गोसावी
पानं- १३०
किंमत-४० Rs.

Friday 13 August 2010

रारंगढांग

रारंगढांग ही माणसाच्या आणि निसर्गाच्या, माणसा माणसातल्या, मैत्रीची आणि संघर्षाची गोष्ट आहे.
एका बाजूला हिमालय दुसर्‍या बाजूला तिथे काम करणारी माणसे. कधी ती हिमालयासमोर क्षुद्र वाटतात/ असतातच, तर कधी ती एवढीशी माणसे त्यांच्या जिद्दीमुळे, इच्छाशक्तीमुळे अफाट वाटत राहतात. या लढाईत या माणसांकडे काय आहे? विज्ञान, तंत्रज्ञान आहेच पण त्या जोडीला आहेत त्यांचे प्राण.
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन हिमालयात रस्ते बांधण्याचं काम करते. विरळ ऑक्सीजन, कमालीची थंडी, रस्त्यावर साठणारे सत्तरऎंशी फूट बर्फ, लॅन्डस्लाईडस, याचा मनावर होणारा परीणाम.... शिवाय़ या वातावरणात यंत्रेही नेहमीच्या क्षमतेने काम करू शकत नाहीत. या उंचीवर जगातल्या कुठल्या देशाने क्वचितच रस्ते बांधले असतील.
ह्या रस्ता बांधण्याच्या कामावर एक विश्वनाथ हा सिव्हीलियन ऑफिसर नेमला जातो. तो मुंबईतली चांगल्या कंपनीतली, चांगल्या पगाराची नोकरी सोडून आवडीचं काम करायला आला आहे.
त्याला रारंगढांगातून रस्ता काढण्याची जागा चुकीची वाटत असते. ढांग म्हणजे उभा नितळ कडा. बाजूने वाहणारी सतलज, त्याच्या कडेने कोरत रस्ता बांधणे हा यातला सगळ्यात अवघड भाग. एकूणच त्याच्या कामामुळे, ज्ञानामुळे, निष्ठांमुळे त्याचे वरीष्ठांशी खटके उडत असतात. साहस आणि धैर्य यांची फक्त सैन्यात गरज असते असं नाही तर सामान्य नागरीकही कितीतरी धैर्याने जगत असतात. तुम्ही धैर्याची, साहसाची व्याख्या कशी करता यावर ते अवलंबून आहे.
विश्वनाथ हा काही मुल्ये मानणारा, आचरणात आणणारा, मुळातून विचार करणारा माणूस आहे.वरवर व्यवस्थेची घडी बसविण्यासाठी काही नियम केलेले असतात पण मुळातून त्यात विचित्र विसंगती असते, हे सगळे नियम परंपरेने पाळले जातात, हे सारे कुणासाठी आणि का? याची उत्तरे कोणी शोधत नाही. सैन्यात तर आपली पायरी आणि वरीष्ठांचे आदेश हे एक मोठेच प्रकरण असते. या माणसाच्या डोळ्यांनी आपण ही गोष्ट बघत जातो, बघत जातोच म्हणायला पाहिजे इतकी कादंबरीची शैली चित्रदर्शी आहे. त्यामुळे सैन्याच्या कामातल्या मर्यादा सहजपणे नजरेत भरत जातात.
विश्वनाथ कामावर रूजू होतो, आपल्या पद्धतीने काम करू पाहतो, अगदी तसं शक्य होत नाही, त्याला आपल्या कामासाठी माणसांचे प्राण घ्यायचे नसतात, तो भीती व्यक्त करत असतो तिथेच रारंगढांगात अपघात होते, सात जणांचा जीव जातो, आपल्या अखत्यारीत विश्वनाथ ढांगात योग्य ते काम करून घेतो. त्यामुळे त्याच्यावर कोर्ट्मार्शल....आणि त्याचा निकाल.
विश्वनाथ हा सगळ्यांना आवडावा असाच नायक आहे. त्याच्याकडे काय नाही? आपल्याला हवंहवंसं वाटतं ते सगळंच. विचार करणं, निरपेक्षपणे योग्य-अयोग्य ठरवू शकणं. त्याचं आपल्या हाताखालच्या माणसाशी वागणं, वरीष्ठांशी वागणं, भवतालाचा विचार करणं, विकास म्हणजे काय? याबाबत संभ्रमात असणं, माणसाच्या प्राणांची किंमत असणं, वडीलांशी एका घट्ट धाग्याने बांधलेलं असणं, आपण प्रेम करतोय हे माहीत नसणं. या सगळ्यात मला आवडलं ते ’ज्यात काही केल्याचा आनंद लाभेल असे काम” करण्याची असोशी.
ही कादंबरी वाचायलाच हवी अशी मी शिफारस करीन. आखीव-रेखीव, व्यक्तीरेखांची घट्ट बांधणी, मोजके पण ठसणारे पसंग, प्रभावी संवाद, सतत सांभाळलेला ओघ, चित्रमय शैली ही या पुस्तकाची वैशिष्ठे आहेत. यातली पत्रं पण फार हृद्य आहेत. विश्वनाथच्या व्यक्तीमत्वाला, कोकणातले बाबा आणि मुंबईतली उमा यांची एक उत्कट, हळवी किनार आहे.

शेवटी ”जब आदमी मर जाता है तो उसका क्या रहता है? एक यादगारी!"

रारंगढांग
प्रभाकर पेंढारकर
मौज प्रकाशन गृह
पाने - १७५

Sunday 27 June 2010

शुभ्र काही जीवघेणे

शोभा गुर्टु, बेगम अख्तर, सादत हसन मंटो, ओपी नय्यर, सज्जाद हुसेन, पार्श्वनाथ आळतेकर आणि पंकज मलिक या सात कलावंतांच्या आयुष्याचा आणि कलाप्रवासाचा वेध घेणार्‍या लेखांचे हे पुस्तक.
आपल्या कलागुणांनी साहित्य, नाट्य, संगीत अन सिनेमाचा परिसर उजळून काढणारी सात कलंदर व्यक्‍तिमत्वं या पुस्तकाला रेलून उभी आहेत.
प्रतिभेच्या वरदानाने आणि नितांत अस्वास्थ्याने सगळेच भारुन गेलेले, ’शुभ्र काही जीवघेणे’ शोधू पाहणारे सात मनस्वी कलावंत.

अंबरीश मिश्र हे याचे लेखक. सर्वच लेख वेगवेगळ्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेले आहेत.

कलावंतांच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेणारे लेखन मराठीत काही नवीन नाही. "गुण गाईन आवडी", "गणगोत" मधून पुलंनी आपल्यापर्यंत पोचवले काही कलंदर. पण अंबरीश मिश्रांची शैली खूप वेगळी आहे.
त्यांची लेखणी अत्यंत उत्कटतेने या सातांच्या जगण्याचा वेध घेते. त्यांच्या कलाप्रवासातील असोशी, सर्जनशीलतेतील प्रमाथीपणा विलक्षण ताकदीने आपल्यावर येउन कोसळतो, आपण अवाक होतो ते या कलावंतांच्या मनस्वी फकिरीमुळे तसेच हे आपल्यासमोर मांडणार्‍या मिश्रांच्या भरजरी तरीही तरल-कोमल भाषेमुळे.

अख्तरीबाईंवरच्या लेखाची सुरुवातच अशी ..
’दुःखाला स्वर देणार्‍या कलावंताला साल्वादॉर दालीने आपला पहिला सलाम सांगितलाय.
माझं पहिलं नमन बेगम अख्तरला आहे, तिच्या प्राणलक्षी सुरांना आहे.
अख्तरीबाईंच्या षड्जात करुणेचा लसलसता कोंभ आहे. आदिम दुःखाचं तेजाब आहे. अन हे तेजाब पचवून टाकण्याची झिंग आहे. ’खालीही सही मेरी तरफ जाम तो आया’ असा फकिरी नशा आहे. अन पुन्हा वर दशांगुळे उरणार्‍या आयुष्याशी जाबसाल करण्याची कलंदरी आहे’

काही शब्दांमध्ये खूप काही पोचवण्याची किमया या पुस्तकात ठिकठिकाणी आहे. पण ही केवळ भाषेची रोषणाई नाही तर वाचक म्हणून आपल्याला ओढून घेतलं जातं त्या प्रपातामध्ये. बेगम अख्तर हे नाव मी पहिल्यांदा वाचलं पुलंमुळे. तो लेख कितीदा वाचूनही त्यांच्या सुरांची ओळख करुन घ्यावी असं केव्हाच वाटलं नाही. अंबरीश मिश्रांची ’अख्तरीबाई’ वाचल्यावर मी तडक ’दीवाना बनाना है तो दिवाना बना दे’ च्या कॅसेटच्या शोधात बाहेर पडलो आणि मिळवलीदेखील. (सुर-स्वरांच्या आस्वादातलं बेसुरेपण मात्र संपलं नाही आणि कॅसेटपेक्षा लेखाचीच अगणित पारायणे झालीत ही कबुली येथे द्यायला हवीच.)

अशा प्रकारच्या कुठल्याही पुस्तकात असतात तसे येथे किस्से, आठवणी, दंतकथा यांचीही भरपूर पेरणी आहे.
ओपी, मंटो यांच्यासारखे विषय असल्यावर तर हे येणारच. हे सारंही खूप सहजतेने (सफाई, स्पष्टीकरणाच्या भानगडीत न पडता) आपल्यापर्यंत येतं.

’ओपी’वरचा लेख हा दोन भागात आहे. सुरुवातीच्या भागात ओपीच्या स्वत:च्या आठवणी आहेत आणि दुसर्‍या भागात ओपी-अंबरीश स्नेहाच्या आठवणी.
ओपीच्या आठवणी या ओळींपाशी संपतात.
’एक मन मला दामटतं-काही आठवू नकोस. वर्तमानात स्वस्थ बैस. दुसरं मन अल्लद भूतकाळात निघून जातं. दोन मनांचा हा झगडा अधूनमधून सुरु असतो. एक हळवं, दुखरं संवेदनशील मन, दुसरं ऐटबाज, रगेल मन. एक मन दुसर्‍या मनाला नेहमी सांगत असतं-- "मैं शायद तुम्हारे लिये अजनबी हूं.

Monday 21 June 2010

चिन्ना

चिन्ना

चिन्ना हा भिल्या आणि मोगी या आदिवासी जोडप्याचा एकूलता एक मुलगा. तो त्याच्या आईला माय व वडिलांना बापूस म्हणतो. हा चिन्ना साधारण ४थी-५वीतला मुलगा. आदिवासी पाड्यातील आश्रमशाळेत ३री पर्यंत तो शिकलेला आहे पण पुढे शिकायची सोय नसल्याने त्याची शाळा सुटली. आणि झालं! त्याच्या मुळच्या खोडकर स्वभावाला बुद्धीची जोड मिळाली आणि झाल्या त्याच्या खोड्या सुरू! पण त्या खोड्यांमधून काहीतरी चांगलं निघतं बरं का? चिन्नाच्या त्या गमती-जमती या पुस्तकात आहेत.

या पुस्तकात एकूण सहा गोष्टी आहेत..
१. खोडकर चिन्ना.......
२. चिन्नाची फजिती.......
३. चिन्ना आणि शिकारी.........
४. कल्पक चिन्ना.........
५. चिन्नाची चतुराई.........
६. नरभक्षकाशी झुंज.........

यातील मला कल्पक चिन्ना ही गोष्ट खूप आवडते. या गोष्टीत चिन्नाची गाठ असते खुद्द " कुप्रसिध्द चंदनचोर वीरप्पन " याच्याशी! जंगलातील सात चंदनाची झाडे चोरील जाऊ नयेत म्हणून चिन्नाने केलेली खटपट खरोखरच अदभूत आहे. ही गोष्ट पुन्हा पुन्हा वाचली तरी कंटाळा येत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे काहितरी वेगळं वाचायला आपल्याला आवडतं. या पुस्तकातील भाषा, वातावरण, एकमेकाशी असलेले संबंध हे सर्वच वेगळे असल्याने वाचायला छान वाटते. पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच चिन्ना एका उंच झाडावर चढून बसलेला आहे. व मागून पक्षी उडत आहेत असे चित्र आहे. मंजुश्री गोखले यांचे हे पुस्तक जरूर वाचण्यासारखं आहे!

चिन्ना

लेखिका- सौ. मंजुश्री गोखले
प्रकाशन- जोत्स्ना प्रकाशन
चित्रकार- पुंडलीक वझे
पृष्ठ क्रमांक- ७०
किंमत- २५ रू.

Wednesday 26 May 2010

शारदासंगीत

हातात रबराचा चेंडू घेऊन रस्त्यावरुन चालत निघालेल्या कोणत्याही पोराकडं पाहत राहायचं. तो पोरगा एखाद्या घराच्या किंवा कोणत्याही भिंतीसमोर आला की आणखीनच नीट पाहायचं त्या पोराकडं. तो पोरगा इकडं तिकडं न पाहता एक गोष्ट सरळ, सणसणीत करणार. कोणती ? हातातला चेंडू तो एकदम जोरात समोरच्या भिंतीवर फेकणार. भिंतीवर ’पॉक’ करुन आपटलेला तो चेंडू आपल्याच हातात पुन्हा झेलणार आणि मगच पुढं जाणार. खात्रीच.
-------------
घसरगुंडी वरुन घसरताना डोळे सणसणीत उघडे ठेवा. नाही तर किलकिले करा. छानच वाटणार. एकदा वाटणार, बाकीचं सगळं तसंच आहे. आपणच फक्‍त खाली खोल खोल निघालो आहोत. एकदा वाटणार, आपण आहोत तिथंच आहोत, बाकीचं सगळं जग हळू हळू वर यायलंय.
अशी ती घसरगुंडी.
जगाची पातळी की काय ती खाली-वर करायला लावणारी.
मला आवडलीच ती.

------------------------------------------------------------------
हे तर तंतोतंत माझं वर्णन असं वाचणार्‍या प्रत्येकाला वाटून सोडणारा हा बेष्टं लेखक म्हणजे प्रकाश नारायण संत.
शारदासंगीत हा त्यांचा दुसरा कथासंग्रह.
लंपन या एका संवेदनाशील मुलाच्या या गोष्टी. त्याच्याबरोबर यात त्याचे आजी-आजोबा आहेत, बाबूराव आहे, चंब्यासारखे मित्र आहेत, सुमी आहे. ग्राउंड आहे, रुळ आहेत, विहिर आहे, शाळा आहे.
वाचक जर लंपनच्या वयाच्या आसपास असेल तर लंपनच्या खांद्यावर हात टाकून या सगळ्या गोष्टींमध्ये रमून जाईल, जर तरुण, प्रौढ, वृद्‍ध असेल तर या सगळ्या गोष्टींमधून अलगद स्वतःच्या मॅड दिवसांमध्ये जाउन पोचेल, त्या आनंदाची पुन्हापुन्हा आठवण काढेल आणि हे सारं कधी हरवलं आपल्यातलं म्हणून हळवा/कातरही होईल कोणी.

या संग्रहात ५ दीर्घकथा आहेत. मला यातील शारदासंगीत ही कथा खूप आवडते. शारदासंगीत विद्यालयात नाव घातल्यापासून ते मास्तरांच्या गैरहजेरीत क्लास घेण्यापर्यंत लंपनची ही गोष्ट. त्या प्रवासात त्याला काय काय नीटच कळतं. आणि त्याच्याबरोबर आपल्यालाही.
परचक्र, आगगाडीच्या रुळांवर, रानी का बाग, घसरगुंडी या बाकीच्या चार कथा.

आपल्या लेखनाबद्दल संतांच्याच शब्दात सांगायचं तर..

मनाच्या कोपर्‍यातील एका हळव्या जगाचं दर्शन घडवणारं हे माझं लेखन.
नाद, गंध, रंग आणि स्पर्श अशा विविध माध्यमांतून त्या वयातील मुलाच्या नव्या कोर्‍या मनाला भिडणारे हे पहिलेवहिले अनुभव, आणि त्यांतून उमटणारी अतिसूक्ष्म संवेदनांची ती धावती वलयं. मनात खोल कुठेतरी झिरपून राहिलेलं हे सर्व कधीतरी अचानकच वरती उफाळून आलं आणि येतच राहिलं.



शारदासंगीत
लेखक : प्रकाश नारायण संत
मौज प्रकाशन
किंमत : १०० रु.
पाने : १६२

Thursday 13 May 2010

झाडं लावणारा माणूस

१९१३ साली आल्प्सच्या पर्वतीय प्रदेशात लेखक फिरत असताना तो प्रदेश अतिशय उजाड असतो. झाडे नाहीत, पाणी नाही. गावे ओस पडलेली. अशा प्रदेशात खूप पायपीट केल्यावर लेखकाला एक मेंढपाळ भेटतो. लेखक त्याच्याबरोबर दोन दिवस राहतो. हा मेंढपाळ एकटा राहात असतो. रोज निवडून १०० सफेद्याच्या बिया तो माळावर जाऊन पेरत असतो.तो प्रदेश झाडांविना मरणपंथाला लागला आहे, असं त्याचं म्हणणं होतं. त्या परीस्थितीत सुधारणा करण्याची जबाबदारी त्याने घेतली होती. तोपर्यन्त त्याने एक लाख बिया पेरल्या होत्या, त्यापैकी दहा हजार झाडे वाढतील असा त्याचा अंदाज होता. लेखक म्हणाला की, त्यापुढील तीस वर्षात ही दहा हजार झाडे छान फोफावतील. त्यावर सहजपणे तो म्हणाला की त्यापुढील तीस वर्षात मी इतकी झाडे लावलेली असतील की दहा हजार झाडे म्हणजे समुद्रातला एक थेंब ठरेल. पुढे खरोखरच बीच वृक्ष लावले, ओक लावले भूर्जपत्र लावली. जंगलच्या जंगल ह्या माणसानं उभं केलं. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढली. झरे वाहू लागले, हवासुद्धा बदलली. त्यामुळे लोक त्या परीसरात राहायला येऊ लागले, गावं वसली. १९४५ साली तिथे राहणार्‍या दहा हजारांहून जास्त माणसांच्या सुखाचं कारण आहेत--एलझेआर बुफिए
एकट्या माणसाने आपलं शरीर आणि मानसीक सामर्थ्य यांच्या जोरावर वैराण वाळवंटाचं नंदनवन केलं.
हे पुस्तक मुळातूनच वाचायला हवं.
एक माणूस एकुलत्या एक आयुष्यात काय करू शकतो याचं हे अविश्वसनीय उदाहरण आहे. आपण पुस्तक वाचत जातो आणि या माणसापुढे नतमस्तक होतो. एका माणसाची कमाल ताकद काय असू शकते!!!
हा बोलका, शिकलेला, हुशार माणूस नाहीये. हा एक फार फार शहाणा माणूस आहे. (आपल्या आजूबाजूची अबोल, चटपटीत बोलू न शकणारी माणसं आतून शहाणी असू शकतात, हे आपण लक्षात ठेवू या, का?) निसर्गाची बिघडलेली व्यवस्था पूर्वपदावर आणण्याचं त्याने ठरवलं. हे त्याचं स्वप्नच किती मोठं आहे. ते त्याने प्रत्यक्षात आणलं.
त्याला एक सलाम!

'झाडं लावणारा माणूस' , लेखक-जॉं जिओनो
अनुवाद--माधुरी पुरंदरे , राजहंस प्रकाशन
किंमत--२५ रू. , पाने--३५

Monday 10 May 2010

मोठया रानातले छोटे घर

नमस्कार! या ब्लॉगवर आवर्जून आलात त्याबद्द्ल धन्यवाद! ही पहिली दोन वाक्य लिहिण्याचे कारण म्हणजे या ब्लॉगवर कविता, हव्या त्या विषयाचे लेखन नसून फक्त पुस्तकांबद्द्लचे लेखन असेल.
त्यातला हा माझा पहिला लेख. पुस्तकाचे नाव " मोठया रानातले छोटे घर ". आता मी तुमचा वाचनाचा वेळ न दवडता सुरूवात करते,

मोठया रानातले छोटे घर हा " लॉरा इन्गाल्स वाईल्डर" यांच्या कादंबरीचा भा.रा. भागवत यांनी केलेला अनुवाद. विसकॉन्सिन च्या मोठ्या रानातील एका छोट्या लाकडी घरात रहायचे लॉरा, तिची आई कॅरोलिन, तिचे बाबा चार्लस, तिची बहीण मेरी आणि तिची कुक्कुली बहीण कॅरी. त्यांच्या आई-बाबांना त्या मा आणि पा असं म्हणायच्या. या इन्गाल्स कुटुंबाच्या गमती-जमती या पुस्तकात आहेत.
लॉरा नि मेरी जवळपास सारख्या वयाच्या पण मेरीचे केस मात्र सोनेरी आणि लॉराचे काळे! दोघी रोज आईला कामात मदत करत. मेरी मोठी असल्याने ती जास्त भांडी पुसायची, पण लॉरा मात्र स्वतःचा वाडगा, ताट्ली काळजीपूर्वक पुसायची. माचं [ आईचं ] या कामांबद्द्ल एक गाणं असे -
धुणी धुवा सोमवारी
इस्त्री करणे मंगळवारी
शिवणे टिपणे मग बुधवारी
ताक घुसळणे गुरूवारी
साफसफाई शुक्रवारी
भट्टी लावू हो शनिवारी
आराम करावा रविवारी!!!
पा [ बाबा] छान फिडल वाजवत. ते कायम मजेशीर गाणी वाजवत. ती गाणी ऐकताना लॉरा टाळ्या वाजवे. ते गोष्टीपण छान सांगत. कधी त्यांच्या वडिलांच्या तर कधी अस्वलांच्या! कधी त्यांच्या मूर्खपणाच्या तर कधी भीतीदायक अनुभवाच्या! कधी शहराच्या तर कधी साखरी बर्फाच्या, तेव्हाच्या नाचाच्या! दर रात्री सगळं काम झाल्यावर त्याच्या फिडलवादनाचा कार्यक्रम होई. आणि कधी मुलींना काही उपदेश करायचा असेल किंवा तुम्हाला असं वाटतं यात काही वेगळं नाही समजवायचं असेल तर ते आपल्या पोतडीतून गोष्टी बाहेर काढत.

अश्या या कुटुंबाचे विसकॉन्सिन च्या मोठ्या रानातील दिवस, तेव्हा घडलेल्या घटना या पुस्तकात आहेत. या पुस्तकाला विशेष कथा नाहीये. पण हे पुस्तक मनात "घर" करतं. पांचं अस्वल समजून लाकडाला मारणं, आत्याला मेरीच्या सोनेरी केसांमुळे तुला तीच आवडते नं? असं लॉराचं विचारणं यावर आपल्यालाही खदखदून हसू येतं. हे पुस्तक आपल्या आवडत्या पुस्तकांच्या यादीत हमखास नाव पटकावतं....

" मोठया रानातले छोटे घर "
लेखिका- " लॉरा इन्गाल्स वाईल्डर"
अनुवादक- भा.रा.भागवत
प्रकाशन - राजा प्रकाशन
किंमत - १०० रू.
हे पुस्तक जरूर वाचा!